इंधन दरवाढीचा भडका

पेट्रोल 3.14 रुपयांनी, तर डिझेल 3.11 रुपयांनी महागले

|नवी दिल्ली | वृत्तसंस्था |


पश्चिम आशियातील युद्धामुळे देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होईल, असे अंदाज आता खरे ठरले आहेत. शुक्रवारी सकाळी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये वाढ करण्यात आली आहे. देशात पेट्रोलच्या किमतीत 3.14 रुपयांची, तर डिझेलच्या किमतीत 3.11 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. इंधन दरवाढीमुळे महागाईचा भडका उडणार असून, सर्वसामान्यांना मोठी झळ बसणार आहे.


दिल्लीत पेट्रोलचा दर प्रति लिटर 97.77 रुपये इतका झाला आहे. तर डिझेलचे दर दर वाढून 90.67 वर पोहोचले आहे. कोलकातामध्ये, पेट्रोलचा नवीन दर 108.74 रुपये आहे, तर डिझेलचे दर वाढून 95.13 रुपये झाले आहेत. देशाच्या आर्थिक राजधानीत मुंबईमध्ये, पेट्रोलचा नवीन दर 106.68 रुपये आहे. तर डिझेलचा दर 93.14 पोहोचला आहे. चेन्नईमध्ये, एक लिटर पेट्रोलचा दर 103.67 रुपये आहे. एक लिटर डिझेलचा दर वाढून 95.25 रुपये झाला आहे.
इराण आणि अमेरिका यांच्यातील सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या (क्रूड ऑइल) किमतीमध्ये भरमसाठ वाढ झाली आहे. त्यामुळे सरकारी तेल कंपन्यांना दरमहा अंदाजे 30 हजार कोटींचा तोटा सहन करावा लागत आहे. कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल सुमारे यापूर्वी 70 डॉलरच्या आसपास होते. मात्र, हे दर प्रति बॅरल 126 डॉलरवर पोहोचले आहेत. देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर गेल्या चार वर्षांपासून स्थिर होते. परंतु आज इंधन दरात लक्षणीय वाढ झाली आहे.


रशियानं युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती गगनाला भिडल्या होत्या. या प्रचंड दरवाढीचा फटका देशांतर्गत ग्राहकांना बसू नये, यासाठी सरकारी मालकीच्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (आयओसी), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) या कंपन्यांनी एप्रिल 2022 मध्ये इंधनाचे दर नियंत्रणात ठेवले होते.


2022-23 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत तेल कंपन्यांना कंपन्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला होता. मात्र, त्यानंतरच्या महिन्यांत तेलाचे दर कमी झाल्यामुळे तेल कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला. परंतु, पश्चिम आशियामध्ये सुरू झालेल्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती पुन्हा एकदा 50 टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत. पश्चिम आशियातील युद्ध सुरू होण्यापूर्वी, म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात देशात आयात केल्या जाणाऱ्या कच्च्या तेलाचे (क्रूड ऑइल) दर सरासरी 69 अमेरिकन डॉलर्स प्रति बॅरल इतके होते. त्यानंतरच्या महिन्यांमध्ये या सरासरी किमती वाढून 113 ते 114 प्रति अमेरिकन डॉलर्स प्रति बॅरलपर्यंत पोहोचल्या आहेत.
यापूर्वी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं ग्राहकांना इंधनाचा अखंड पुरवठा होण्यासाठी अनेक प्रभावी उपाययोजना केल्याचा दावा केला होता. तसेच देशभरात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध असून तुटवड्याची कोणतीही नोंद झालेली नाही, असेही म्हटलं होतं.

Exit mobile version