उर्दू हायस्कूल इमारतीसाठी निधीची मागणी

। नागोठणे । वार्ताहर ।
नागोठणे एज्युकेशन सोसायटीच्या नादुरुस्त झालेल्या उर्दू हायस्कूल व जुनिअर कॉलेज इमारतीची पाहणी खा. सुनील तटकरेंकडून सोमवारी (दि.27) सकाळी करण्यात आली. यावेळी नागोठणे एज्युकेशन सोसायटीच्या स्थानिक शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने इमारत दुरुस्तीसाठी खर्चाचा अंदाजपत्रकीय प्रस्ताव सादर करून निधीची मागणी केली. इमारत दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध होण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल असे आश्‍वासन यावेळी खा. सुनील तटकरे यांनी शाळा व्यवस्थापन समितीला दिले.

नागोठण्यातील उर्दू हायस्कूल या इमारतीच्या काही वर्ग खोल्यांचा स्लॅब व इतर काही भाग नादुरुस्त झाल्याने स्थानिक शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने रोहा पंचायत समितीचे सदस्य बिलाल कुरेशी यांनी काही दिवसांपूर्वी खा. सुनील तटकरे यांची सुतारवाडी येथे भेट घेऊन नादुरुस्त झालेल्या उर्दू हायस्कूलच्या या इमारतीच्या दुरुस्तीसाठी 12 ते 15 लाख रुपये निधीची मागणी केली होती. बिलाल कुरेशी यांनी सांगितल्यानुसारच आपण या इमारतीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आल्याचे खा. सुनील तटकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

नागोठण्यातील इमारतीच्या दुरुस्तीसाठी ते नक्कीच निधी मिळवून देतील असा विश्‍वास लियाकतशेठ कडवेकर यांनी व्यक्त केला. यावेळी खा. सुनील तटकरे यांचे नागोठणे एज्युकेशन सोसायटी तसेच पं.स. सदस्य बिलाल कुरेशी यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

Exit mobile version