माणगाव बसस्थानक नूतनीकरणासाठी निधी मंजूर

गैरसोयींचा फेरा संपणार; प्रवाशांना मिळणार सुविधांसह दिलासा

। माणगाव । वार्ताहर ।

माणगाव एसटी बस स्थानकाच्या नूतनीकरणासाठी तब्बल दिड कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यामुळे लाखो एसटी बस प्रवाशांना गैरसोयीचा फेरा संपणार असून त्यांना सर्वतोपरी सर्व सुविधा मिळणार आहेत. या मंजुरीमुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

या नूतनीकरणाची निविदा यापूर्वीच प्रसिद्ध झाली असून लवकरच हे काम सुरू होणार आहे. गेल्या वर्षी बसस्थानका समोरील सिमेंट काँक्रिटकरणासाठी 16 लाख रुपये खर्च आला आहे. तर दोन महिन्यांपूर्वी काँक्रिटीकरणासाठी 1 कोटी 2 लाख रुपये मंजूर झाले होते. त्यांचे कामही काही दिवसांनी पूर्ण होणार आहे. असे एकूण 2 कोटी 62 लाख रुपये मंजूर करून आणले आहेत. गेल्या 25 वर्षांपासून प्रवाशांना तुंबलेले पाणी, खाच खळगे आणि मोठमोठ्या खड्ड्यातून बस स्थानकात प्रवेश करावा लागत होता. यासाठी विविध सामाजिक संघटनांनी आंदोलन केले होते. हे खड्डे कायमस्वरूपी नष्ट होण्यासाठी या आवाराचे काँक्रिटीकरण करण्यासाठी आंदोलन केले होते.

त्यामुळे माणगाव बस स्थानकांच्या काँक्रिटीकरण आणि नूतनीकरण मंजूर झाले आहे. यामुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. या नूतनीकरणासाठी मंडळाने 1 कोटी 44 लाख 37 हजार 303 रुपये मंजूर केले आहेत. या कामात गटारे, प्लास्टर, छप्पर, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, लाईट, फर्निचर, आसन व्यवस्था, विविध कक्ष आदी सर्व प्रकारच्या सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. त्यामुळे हे स्थानक आधुनिक आणि सुसज्ज होऊन सुसाट धावणार आहे. हे बस स्थानक रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाणी असल्याने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. तसेच हे बस आगार सतत एसटीला फायदा मिळवून देणारे आहे. या बस स्थानकासाठी 50 वर्षांपूर्वी माजी आमदार स्व. अशोक दादा साबळे प्रयत्न केले होते. त्याचे भूमीपूजन 1981 मध्ये तत्कालीन बांधकाम राज्यमंत्री स्व. रविंद्र राऊत यांनी केले होते.त्यानंतर आगारासाठी त्यांनी उपोषण केले होते.

Exit mobile version