स्वा.सै. गोविंद गणू पाटील हरहुन्नरी कलावंत; आ.जयंत पाटील यांचे भावपूर्ण उद्गार

चिंचोटीत शोकसभा

| अलिबाग | प्रतिनिधी |

राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, संस्कृती क्षेत्रात आपल्या कार्याचा अमुल्य ठसा उमटविणारे चिंचोटी, ता.अलिबाग येथील माजी सरपंच, कलावंत, स्वातंत्र्य सैनिक गोविंद गणू पाटील यांचे कार्य प्रेरणादायी असेच होते. त्यांच्या निधनाने जुन्या पिढीतील हरहुन्नरी कलावंत काळाच्या पडद्याआड गेला आहे. असे प्रतिपादन शेकाप सरचिटणीस आ.जयंत पाटील यांनी चिंचोटी येथे केले.

गोविंद पाटील यांना आदरांजली वाहण्यासाठी रविवारी (दि.1) दुपारी 3 वाजता मारुती मंदिर येथे शोकसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी शेकाप सरचिटणीस आ.जयंत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करीत त्यांच्या कार्याचा आढावा घेतला.

ते पुढे म्हणाले की, गोविंद गणू पाटील यांचे सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. ते अखेरपर्यंत टिकविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांच्या अंगी विविध पैलू होते. नाटक असो वा भाषण अथवा सामाजिक कार्य यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. शेतकर्‍यांचे नेते नाना पाटील यांचे ते मानसपूत्रच म्हणून ओळखले जात होते. लोकल बोर्डाच्या निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळवून देण्यात आणि निवडूण आणण्यात नाना पाटील यांचा मोठा वाटा होता. याचे स्मरणही जयंत पाटील यांनी आपल्या भाषणातून केले.

आगरी समाज संघाची मुहूर्तमेढ रोवण्यातही गोविंद गणु यांचा पुढाकार राहिला होता. समाज एकसंघ राहिला पाहिजे अशी त्यांची धारणा होती. कोणासोबतही त्यांचे कुठलेच शत्रुत्व नव्हते. उलट सर्वांनी मिळून मिसळून राहण्यातच त्यांनी आनंद मानला, असेही ते म्हणाले. त्यांनी केलेले कार्य हे भावी पिढीला समजणे गरजेचे आहे. यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, अशी अपेक्षाही जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

गोविंद पाटील यांना रायगड जिल्हा परिषदेचा रायगड भूषण मिळवून देण्यात मीनाक्षी पाटील यांनी विशेष पुढाकार घेतला होता. शिवाय आज त्यांच्या सारख्या कलावंतांना जी सरकारी पेन्शन मिळते त्यासाठी मीनाक्षी पाटील आणि माझ्या माध्यमातून गोविंद पाटील यांनीच पुढाकार घेऊन सरकारकडून मंजूर करुन घेतली होती, याचे स्मरणही जयंत पाटील यांनी आपल्या भाषणातून केले.

यावेळी शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, विक्रांत वार्डे, प्रमोद घासे, महेश घावरे, नवनीत पाटील, मोहन धुमाळ, जनार्दन शेळके, संजय पाटील, देवयानी पाटील, शंकरराव तांबडकर, नौशाद मुजावर, जयंवत तांबडकर, गिरीश तेलगे, योगेंद्र पाटील, सुधीर चेरकर, प्रकाश खडपे, सुधीर पाटील, जयवंत ठाकूर, जयवंत तांबडकर, सुभाष वागळे, नवनीत पाटील, वसंत पाटील उपस्थित होते.

Exit mobile version