नेरळ स्मशानभूमीत लाईट नसल्याने मोठी गैरसोय
| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ हिंदू स्मशानभूमीत लाईटअभावी मृतदेहावर मोटारसायकलमधील लाईटच्या उजेडात अंत्यसंस्कार करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. स्मशानभूमीत विद्यूतपुरवठा नसल्याने ही वेळ त्यांच्या नशिबी आली. दरम्यान, या घटनेमुळे नेरळकर चांगलेच आक्रमक झाले होते, तर ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत ग्रामस्थांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदविला.
शनिवार, दि. 22 जून रोजी नेरळ पूर्व परिसरातील मातोश्री नगर येथील राहणाऱ्या साक्षी साळवी यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. यावेळी मृतदेह हा अंत्यसंस्कारासाठी नेरळ हिंदू स्मशानभूमीत आणण्यात आला होता. रात्रीचे 10 वाजल्याने येथे अंधार होता. स्मशानभूमीत काम सुरू असल्याने येथील विद्युतपुरवठा नसल्याचे समोर आले, तर स्मशानभूमीच्या पायवाटेवरून मृतदेह घेऊन आत प्रवेश करीत असताना ग्रामस्थांना खडतर रस्त्याचा सामना करावा लागला. ठेकेदाराने आपले साहित्य उचलले दिसत नाही, उभ्या राहण्यासाठी असणाऱ्या जागेवर अस्ताव्यस्त सामान विखुरलेले असल्याचा आरोप उपस्थित ग्रामस्थांनी केला. ही परिस्थिती आत्ताची नसून गेले कित्येक दिवस येथे दिवसाही अंत्यसंस्कार करण्यासाठी येणाऱ्या ग्रामस्थांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो.
दरम्यान, त्यावेळी सुदैवाने सरण कसेबसे रचून झाल.े नगरिकांनी अंधाराचा सामना आपल्या मोटारसायकलच्या लाईट सुरू करून दूर केला. अंत्यसंस्काराचा विधी सुरू होणार इतक्यात पावसाने रिमझिम सुरुवात करून पुन्हा एकदा संकट उभे केले. स्मशानभूमीच्या कामासाठी शेडवरील पत्रेच ठेकेदाराने काढून ठेवले होते. त्यामुळे पावसाच्या पाण्याने सरण आणि मृतदेह हे दोन्ही भिजण्ार असल्याने ग्रामस्थांना कपाळावर हात लावण्याची वेळ आली होती, परंतु दैवी चमत्कार झाला पाऊस काही काळ थांबला, तोच ग्रामस्थांनी मृतदेहावरील सर्व अंत्यसंस्कार घाईगडबडीत उरकून घेतले.
एकूणच काय, तर नेरळ ग्रामस्थांना स्मशानभूमीतदेखील जाण्यासाठी खडतर सामना करावा लागतो. सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, तर येथील पुढारी हे झोपलेत का? त्यांच्या घरच्याबाबत अशी परिस्थिती निर्माण झाल्यास काय केले असते म्हणून संताप व्यक्त होत होता. जिल्ह्यातील सर्वात नावलौकिक असलेल्या नेरळ ग्रामपंचायत सत्ताधारी आणि विरोधकांनी नेरळ ग्रामपंचायतीचा कारभार चव्हाट्यावर आणून ठेवल्याने ग्रामस्थांनी याचा निषेध नोंदविला आहे.
स्मशानभूमीत काम सुरू आहे, तेथे लाईटची सोय आहे; परंतु काही तांत्रिक अडचण असल्याने त्या दिवशी बंद होती. ठेकेदारालाही सूचना केल्या आहेत. अधिक लाईट बसवण्याचीदेखील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सूचना केल्या आहेत, नागरिकांना झालेली गैरसोय ही नक्कीच खेदाची बाब आहे; परंतु यापुढे लक्ष ठेवले जाईल, ग्रामस्थांनीदेखील सहकार्य करावे.
अरुण कारले,
ग्रामसेवक, नेरळ ग्रामपंचायत