| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम दिवंगत जी. एच पाटील यांनी संघटनेच्या माध्यमातून केले आहे. संघटना मजबूत करण्याचे खरे श्रेय पाटील यांना जात आहे. सहाय्यक प्रशासनासह युनियन अध्यक्ष असताना सर्व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी काम केले, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद युनियन कार्याध्यक्ष ॲड. बाबुराव पुजारवाड यांनी केले.
रायगड जिल्हा परिषद सेवा निवृत्त संघटना अध्यक्ष स्व. जी. एच पाटील यांचे 27 डिसेंबरला निधन झाले. त्या निमित्ताने अलिबागमधील पंचायत समितीच्या सभागृहात शोकसभेचे आयोजन शुक्रवारी (दि.9) संघटनेच्या वतीने करण्यात आले. यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य द्वारकानाथ नाईक, सुरेश म्हात्रे, किशोर घरत, ए.बी. पाटील, ए. एम. पाटील, मंगेश पाटील, राम लाड, प्रकाश काळे, डॉ. राजेंद्र म्हात्रे, शुभदा पाटील, चारुलता कोरडे, सुविधा म्हात्रे, उल्हास इंदुलकर, संतोष साळावकर, सुदिन कांबळे, सुरेश जांभळे, अंजू वर्तक, रश्मी कांबळे, अशोक कुकलारे, झेंडेकर, सुचिता पाटील, मदन मोरे, डॉ. रवि पाटील आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद युनियन कार्याध्यक्ष ॲड.बाबुराव पुजारवाड यांनी सांगितले की, जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत राज्यात अनेक बैठका झाल्या. या बैठकांमध्ये जी. एच. पाटील उपस्थित राहत होते. ते एक अभ्यासू नेतृत्व असणारे व्यक्तिमत्व होते. संघटनेसाठी सढळ हाताने मदत करणारे एक निष्ठावन व्यक्ती होते. त्यांच्या निधनाने संघटनेत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अलिबाग युनियन हे राज्यात अग्रेसर असल्याचे बोलणे वावगे ठरणार नाही. कारण जी. एच पाटील यांच्या नेतृत्वाखाली चांगले काम संघटनेने केले आहे. सर्वांना पुढे नेण्याचे काम पाटील यांनी केले आहे. अनेक माणसे त्यांनी निर्माण केली आहेत. संघटना मजबूत करण्याचे खरे श्रेय जी.एच पाटील यांना जात आहे. सहाय्यक प्रशासनासह युनियन अध्यक्ष असताना सर्व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी काम केले. संघटनेसाठी निष्ठा ठेवून काम केल्यास जी. एच पाटील यांना खरी श्रध्दांजली ठरेल, असे पुजारवाड म्हणाले.







