विद्यार्थ्यांची विश्व विक्रमाकडे वाटचाल
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हाउस ऑफ कलाम, स्पेस झोन इंडिया, मार्टिन ग्रुप यांच्या वतीने डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सँटेलाईट लाँच व्हेहीकल मिशन 2023 आयोजित करण्यात आले आहे. यासाठी आदर्श शाळा वायशेत येथील तीन गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.
वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद होणार्या प्रकल्पात जिल्हा परिषद अलिबागच्या आदर्श शाळा वायशेतचे तीन हुशार, गरीब आणि होतकरू विद्यार्थी मोनिका संदीप बाबर, बबिता नंदकुमार चौहान, करण संतोष जाधव यांना स्कॉलरशिप देऊन सहभाग करून घेण्यात आलेला आहे असे शाळेच्या मुख्याध्यापिका श्रद्धा पाडगे यांनी सांगितले.
पहिलाच जागतिक प्रयोग
19 फेब्रुवारी 2023 रोजी तमिळनाडूतील पत्तीपुरम येथून 150 पिको सँटेलाईट हे परत वापरल्या जाणार्या रॉकेट सह प्रक्षेपित होणार आहे. सदरचे रॉकेट उपग्रह प्रक्षेपित केल्यानंतर पराशूटच्या मदतीने परत जमिनीवर उतरणार आहे. हे रॉकेट पुन्हा पुढील मिशनसाठी वापरता येईल असा प्रयोग सर्व प्रथम अमेरिकेमध्ये एलोन मस्क यांनी केला होता. संपूर्ण जगात विद्यार्थ्यांनी बनविलेले 150 पिको सॅटेलाईट आणि परत वापरले जाणारे रॉकेटसह प्रक्षेपण असा जगातील पहिलाच शैक्षणिक प्रयोग आहे. त्यामुळे या प्रकल्पाची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये होणार आहे.
सहभागी प्रत्येक विद्यार्थ्यास वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, असिस्ट वर्ल्ड रेकॉर्ड असे प्रशस्तीपत्र दिले जातील. सहभागी प्रत्येक विद्यार्थ्यास पिको उपग्रह आणि रॉकेट बनविण्या संबंधित 10 दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षण दिले जात आहे. उपग्रह बनविण्यासाठी पुणे, नागपूर आणि परभणी येथे विद्यार्थ्याची कार्यशाळा लवकरच आयोजित केली जाणार आहे. तसेच या विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा घेऊन मेरीट मध्ये येणारे 100 विद्यार्थी चेन्नई येथे जाऊन प्रत्यक्ष रॉकेट बनवतील. यासाठी ए.के.आय. एफ. राज्य समन्वयक मनिषा चौधरी, जनरल सेक्रेटरी मिलिंद चौधरी, कोकण विभाग समन्वयक व मार्गदर्शक संदीप वारगे यांचे योगदान मोलाचे आहेत.