। म्हसळा । वार्ताहर ।
निसर्गाचे वरदान लाभलेल्या म्हसळा तालुक्यातील देवघर येथील स्वयंभू अमृतेश्वर मंदिराजवळचा गायमुखी धबधबा पावसाळ्यात ओसंडून वाहू लागल्याने येथे वीकेंडला पर्यटकांची मांदियाळी वाढली आहे. म्हसळा शहरापासून अवघ्या 4 कि.मी. अंतरावर दिघी-पुणे राष्ट्रीय महामार्गालगतच असलेल्या इतिहासकालीन स्वयंभू अमृतेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरून वाहत असलेल्या छोटेखानी नदीच्या पात्राला 20 फूट उंचीवरून दगडाने कोरलेल्या गायीच्या शिल्पाच्या मुखातून कोसळणार्या धबधब्याची रुंदी 30 फूट आहे. येथे येण्या-जाण्यासाठी सुखकर मार्ग आहे. डोंगरदरीतून वाहत येणार्या स्वच्छ निर्मळ पाण्यात अपघात होण्याची कोणतीही भीती नसल्याने अनेक पर्यटकांना हा धबधबा आकर्षणीय ठरत आहे. कुटुंब व मित्रमंडळींसोबत अनेक पर्यटक देवघराच्या धबधब्यात पोहण्याचा मनमुराद आनंद लुटतात, शिवाय पर्यटन आणि देवदर्शन असा योगायोग घडून येतो. येथील धबधबा स्वच्छ व एकांतात असल्याने वाहून येणारे पाणी दगडामध्ये कोरलेल्या गायीच्या मुखातून येत असल्याचे विहंगम दृश्य पाहून पर्यटकांना अन्य ठिकाणापेक्षा हा धबधबा जास्तच आकर्षणीय होत आहे.