भाजपवर गजानन कीर्तिकरांची नाराजी

| मुंबई | प्रतिनिधी |

शिवसेनेचे शिंदे गटाचे खा. गजानन कीर्तिकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे यंदाची लोकसभा निवडणूक लढणारा मुलगा अमोल कीर्तिकर यांच्या विरोधात प्रचार करणार आहेत. पण सध्या सुरू असलेल्या ईडी चौकशीवर ते कमालीचे नाराज आहेत. भारतीय जनता पक्षाच्या सरकारने माझ्या मुलाला अकारण लक्ष्य केले असल्याचा आरोप खा.गजानन कीर्तिकर यांनी माध्यमांशी बोलताना केला. ते म्हणाले, की कोरोना काळातील कोणत्याही गैरव्यवहाराशी मुलगा अमोल कीर्तिकर याचा कसलाही संबंध नाही. त्यात काहीही काळेबेरे नसताना अमोलला चौकशीसाठी बोलावले जाणे हे वाईट आहे. भाजप ज्या प्रकारे यंत्रणांचा वापर करते आहे, ते योग्य नाही. अमोल आणि मी एकाच घरात रहातो. आम्ही भोजनाच्या टेबलवर एकत्र असतो. मात्र तो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसमवेत राहणार असल्याने मी विरोधात प्रचार करणार आहे.

‘बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार चाललेली शिवसेना उद्धव ठाकरे यांनी भलत्याच दिशेला वळवली. हा बदल मला मान्य नव्हता. उद्धव ठाकरे यांच्याशी माझे संबंध राहिले नाहीत. ते योग्य प्रकारे संवाद ठेवत नव्हते. त्यामुळे मी एकनाथ शिंदे यांनी उठाव करताच त्यांच्यासमवेत गेलो. अमोल तिथेच राहून त्यांच्याकडून उमेदवार झाला आहे. मी त्याच्या विरोधात प्रचार करणार हे निश्‍चित’, असेही ते म्हणाले.

Exit mobile version