चौल-भोवळे येथे दत्तनामाचा गजर

दत्त टेकडीवर दुमदुमला दिगंबराचा जयघोष

| चौल | प्रतिनिधी |

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा… या दत्तनामाच्या जयघोषाने चौल-भोवळे येथील दत्त टेकडीचा संपूर्ण परिसर भक्तीमय वातावरणाने भारुन गेला होता. निमित्त होते वार्डे गुरुजी दत्त आरती मंडळ, चौल आयोजित दत्तमहाराजांच्या मंदिराला 108 प्रदक्षिणा घालण्याच्या सोहळ्याचे. हा कार्यक्रम मार्गशिर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी (दि.24) उत्साही वातारवणात पार पडला. यावेळी शेकडो दत्तभक्त टेकडीवर उपस्थित होते.


दरवर्षीप्रमाणे वार्डे गुरुजी दत्त आरती मंडळ, चौलच्या पुढाकारातून दत्त मंदिराला 108 प्रदक्षिणा घालण्याचा सोहळा पार पडला. जवळपास एक तासाहून अधिक काळ सुरु असलेल्या या कार्यक्रमामध्ये प्रत्येकाच्या मुखातून फक्त दत्तनामाचा जप होत होता. त्यामुळे संपूर्ण परिसर दिगंबराच्या जयघोषात दुमदुमून गेला होता. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंदिराचे गुरव प्रभाकर आगलावे, आशिष वासुदेव, सचिन राऊत आणि वार्डे गुरुजी दत्त आरती मंडळाचे सभासद यांनी मेहनत घेतली. या कार्यक्रमास शेकडो दत्तभक्त उपस्थित होते. शेवटी दत्तमहाराजांची आरती आणि त्यानंतर प्रसाद वाटप करुन कार्यक्रमाची यशस्वी सांगता करण्यात आली.

गुरुवारी दत्त परिक्रमा
सालाबादप्रमाणे याहीवर्षी दत्त आरती मंडळ, चौलच्या माध्यमातून गुरुवार, दि. 1 डिसेंबर 2022 रोजी दत्त परिक्रमा कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी संपूर्ण दत्त डोंगराला पायी पालखी मिरवणुकीद्वारे प्रदक्षिणा घालण्यात येणार आहे. परिक्रमेस दत्त मंदिरातून दुपारी साडेतीन वाजता सुरुवात होईल. त्यानंतर स्वामी समर्थांच्या मंदिराजवळून सराईमार्गे (सोमेश्‍वर मंदिर) भोवाळे येथील मुख्य प्रवेशद्वारातून पालखी दत्त मंदिराकडे मार्गस्थ होईल. दत्त मंदिरात आरती झाल्यानंतर परिक्रमेची सांगता होईल. या परिक्रमेत जास्तीत जास्त दत्तभक्तांनी सहभागी व्हावे, असे आवाहन दत्त आरती मंडळाच्या प्रमुखांनी केले आहे.

Exit mobile version