| अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील गरुडपाडा येथे कबड्डीचे सामने सुरु असताना प्रेक्षक गॅलरी कोसळली. त्यात चारजण जखमी झाले. तिघांना उपचार करून सोडण्यात आले असून एकाला अधिक उपचारासाठी अन्य रुग्णालयात हलवण्यात आले. ही घटना शनिवारी रात्री साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास घडली असल्याची माहिती अलिबाग पोलिसांनी दिली.
गरुडपाडा येथे कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धा पाहण्यासाठी बहुसंख्येने प्रेक्षकांनी गर्दी केली होती. शेकडो प्रेक्षक बसतील अशी प्रेक्षक गॅलरी तयार करण्यात आली होती. कबड्डीचा खेळ बघण्यात मग्न असताना अचानक लोखंडी प्रेक्षक गॅलरी कोसळली. त्यामध्ये चारजण जखमी झाले. दोघांना किरकोळ तर आणखी दोघांना गंभीर दुखापत झाली. चौघांवर अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.







