आवास यात्रेत रात्रीस खेळ चाले

घंटाच्या निनादांनी आसमंत दुमदुमला
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
येथील आवासची श्री नागेश्‍वराचा उत्सव बुधवारी पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोनामुळे सलग दुसर्‍या वर्षी येथील यात्रा रद्द करण्यात आली आहे. तरी भाविक दर्शनाचा लाभ घेत आहेत. नागेश्‍वर मंदिरात रात्री गण खेळण्याची परंपरा आजही सुरू आहे. नागेश्‍वर उत्सव असल्याने भाविकांनी मोठी गर्दी दर्शनासाठी झाली आहे. नागेश्‍वराचा गण खेळ पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. नागेश्‍वर यात्रेत दरवर्षी लाखोंची उलाढाल होत असते मात्र कोरोनामुळे यात्रा रद्द झाल्याने व्यवासायिकांना फटका बसला आहे.
आवास गावात पुरातन श्री नागोबा मंदिर आहे. एकेकाळी इथं नागोबा नावाचे सत्पुरुष राहत होते आणि त्यांच्या सोबत त्यांचे शिष्य बुधोबा आणि चांगोबा देखील वस्तीला होते अशी आख्यायिका आवास भागात प्रसिद्ध आहे. सकाळी समुद्रस्नान घ्यायचे, मग आवासच्या वक्रतुंड विनायकाचे दर्शन घेऊन कनकेश्‍वराच्या दर्शनाला जायचे आणि मग रात्री मुक्कामाला आवास गावात परतायचे अशा नेमाने त्यांनी आयुष्य जगले. नागोबांची शंभरी पूर्ण झाल्यावर त्यांनी आणि यथावकाश त्यांच्या शिष्यांनी संजीवन समाधी घेतली आणि मग पाषाण रूपात त्यांची पूजा केली जाऊ लागली. तेच हे नागोबा देवस्थान.
नागेश्‍वर यात्रेच्या आधी दोन दिवस उत्सव सुरू होतो. यावेळी नागेश्‍वरासमोर गण खेळले जातात. हा तीन दिवसांचा कार्यक्रम असतो. बसलेले गण त्याचबरोबर इतर गण खेळले जातात. यामध्ये परंपरेने सुरू असलेल्या गण खेळात आता तिसरी ते चौथी पिढी सहभागी होत आहे. प्रत्येक गण हा नागेश्‍वराला पेरकूट, नारळ, सुपारी, केवडा अर्पण करतात. तर एक गण हा मंदिरात नवसाच्या लावलेल्या शेकडो घंटा वेताच्या छडीने वाजवतो. गणाचा हा खेळ तीन दिवस रात्री खेळला जातो. हा खेळ पाहण्यासाठी हजारो भाविक गर्दी करतात. यावर्षी कोरोना संकट कमी झाले असले तरी सुरक्षेच्या दृष्टीने यात्रा उत्सव रद्द करण्यात आलेला आहे. मात्र पारंपरिक पद्धतीने नागेश्‍वराचा तीन दिवसांचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.

Exit mobile version