पोलादपूर तहसिलदारांकडे ऑक्सीजन कॉन्सट्रेटरची दिली भेट
। पोलादपूर । प्रतिनिधी ।
तालुक्यातील दूर्गम भागात लोकमान्य टिळकांच्या मृत्यूच्यावर्षी पांडूरंग सकपाळ यांच्या जन्मानंतर नवसपूर्तीसाठी स्थापन करण्यात आलेल्या उतेकर-सकपाळ कुटूंबियांच्या गणेशोत्सवाचे यंदा 101 वे वर्ष असल्याने यंदा संपूर्ण उतेकर-सकपाळ परिवार सहकुटूंब उपस्थित राहून हा सोहळा साजरा केला आणि दुपारी दोन वाजता गणेशमूर्ती विसर्जन करण्यापूर्वी एका छोटेखानी सोहळयामध्ये पोलादपूरच्या तहसिलदार दिप्ती देसाई यांच्याकडे तालुक्यातील कोरोना रूग्णांसाठी ऑक्सीजन कॉन्सट्रेटरचे एक युनिट भेट दिले.
पोलादपूर तालुक्यातील कोतवाल खुर्द येथे उतेकर-सकपाळ कुटूंबियांची घरे असलेली सुमारे 70 सदस्यसंख्येची लोकवस्ती गणेशोत्सवानिमित्त गावाकडे येऊन दरवर्षी आळीपाळीने उत्साहाने एकोप्याने उत्सव साजरा करीत आहे. गेल्यावर्षी या गणेशोत्सवाची शताब्दीपूर्ती असूनही कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे उतेकर-सकपाळ कुटुंबिय गावी येऊ शकले नाहीत. मात्र, यंदा 101 व्या वर्षानिमित्त या कुटूंबियांनी मोठया स्वरूपात गणेशोत्सवाचे आयोजन केले. याप्रसंगी तहसिलदार दिप्ती देसाई, नायब तहसिलदार शरद आडमुठे, ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर, सामाजिक कार्यकर्ते मंगेश शिंदे तसेच उतेकर सकपाळ परिवारातील सदस्य व विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते आ.प्रवीण दरेकर यांचे स्वीय सचिव राहुल सकपाळ आदी उपस्थित होते.
याप्रसंगी तहसिलदार दिप्ती देसाई यांनी, उतेकर-सकपाळ कुटूंबियांनी 101 व्या गणेशोत्सवानिमित्त सामाजिक जाणीव म्हणून तालुक्यातील कोरोना रूग्णांसाठी ऑक्सीजन कॉन्सट्रेटरचे एक युनिट भेट दिल्याबद्दल तालुक्यातील संपूर्ण प्रशासनातर्फे धन्यवाद दिले.