क्लस्टर समूह योजनेचा लाभ गणपती उद्योगांनी घ्यावा- जिल्हाधिकारी किशन जावळे


| पेण | प्रतिनिधी |

पेण तालुका हे गणपतीचे माहेरघर असून, देश-विदेशातही येथूनच गणेशमूर्ती पाठवल्या जातात. आताच या गणेशमूर्तींना भौगोलिक मानांकन मिळाले आहे. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागामार्फत क्लस्टर विकसित करण्यात येत आहे. जास्तीत जास्त गणपती व्यावसायिकांनी एकत्र येऊन या क्लस्टर समूह केंद्र योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी हमरापूर येथील गणपती कारखानदारांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना केले.

महसूल पंधरवडानिमित्त जिल्हा उद्योग केंद्राद्वारे श्री मोरया गणपती आयडॉल फाऊंडेशन आयोजित क्लस्टर समूह विकास केंद्र योजना मार्गदर्शन कार्यक्रम हमरापूर, पेण येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी.एस. हरळय्या, पेण प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार तानाजी शेजाल, नायब तहसीलदार प्रसाद काळेकर, क्लस्टस विशेष हेतू वहन संस्थेचे निशिकांत गायकवाड उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी किशन जावळे म्हणाले की, हमरापूर विभागात दोनशेपेक्षा जास्त गणपती बनविणारे कारखाने आहेत. येथील कारागीर अतिशय सुबक, आकर्षक मनमोहक, सुंदर अशा गणेशमूर्ती बनवितात. या मूर्ती भारतातील सर्व भागात तसेच परदेशातही पाठविल्या जातात. या गणेशमूर्ती कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाच्या उद्योग विभागाद्वारे हमरापूर, पेण येथे क्लस्टर समूह केंद्र तयार करण्यात येत आहे. या माध्यमातून मूर्तीकारांना विविध सेवा सवलतीचा लाभ घेता येईल. तसेच एकत्रित सुविधा घेता येतील. तसेच आगामी काळात क्लस्टरसाठी लागणार्‍या सामूहिक सुविधा केंद्रात अत्याधुनिक यंत्र सामुग्री उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही किशन जावळे यांनी सांगितले. तसेच जिल्हा प्रशासन सर्वोतोपरी सहाय करेल, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक हरळय्या यांनी उद्योग विभागामार्फत राबविण्यात येणार्‍या क्लस्टर समूह केंद्र योजनेंतर्गत गणपती कारखानदारांना देण्यात येणार्‍या सुविधांची सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमास सरपंच, स्थानिक कारखानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version