ज्येष्ठ नेते,माजी मंत्री स्व.गणपतराव देशमुख यांची गुरुवारी (10 ऑगस्ट) जयंती. महाराष्ट्राच्या राजकीय,सामाजिक,सहकार,शैक्षणिक क्षेत्रात सात दशकांहून अधिककाळ कार्यरत राहिलेल्या आबासाहेबांची सर्वसामान्यांशी जुळलेली नाळ हे मोठे समीकरण होते.त्यांच्या जयंतीनिमित्त या लोकनेत्याच्या कार्याचा घेतलेला हा मागोवा.
10 ऑगस्ट 1927 ला पेनूर या गावी जन्मलेल्या गणपतराव देशमुख यांनी माध्यमिक शिक्षण पंढरपूर येथे घेतले. पुण्याच्या एस पी कॉलेज मधून ते पदवीधर झाले. कायद्याची पदवी त्यांनी 1956 मध्ये प्राप्त केली, विद्यार्थी दशेतच राजकारणाचे बाळकडू त्यांना मिळाले, पुण्यामध्ये विद्यार्थी आंदोलनात सहभाग घेतला. विद्यार्थी आंदोलनातून राजकारणाला सुरुवात… गोविंदराव बुरगुटे, एस एस पाटील, डॉ आप्पासाहेब पवार या मित्रांच्या सहाय्याने त्यांनी विद्यार्थ्यांच्या फी वाढ विरोधी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी तुरुंगवास ही भोगला.
वकिलीचे शिक्षण घेतलेला हा उमदा तरुण, सांगोला-पंढरपूर परिसरात वकिलीची प्रॅक्टिस करू लागला. घरची परिस्थिती उत्तम, देशमुखी रुतबा होता. आपले चुलते गौडवाडीचे यशवंतराव देशमुख यांच्या कोर्टाच्या खटल्यात त्यांना मदत करू लागले. 1890 च्या दुष्काळात बुद्धेहाळ तालुका सांगोला येथे इंग्रजांनी तलाव बांधण्यासाठी हाती घेतला होता. पण खूप दिवस काम रेंगाळले होते. अखेर 1956 ला या तलावाचे काम पूर्ण झाले. या तलावात 150 घरे आणि 1600 एकर जमीन गेली होती. जमीन गेलेल्या लोकांचे पुनर्वसन होत नव्हते.. म्हणून गणपतराव देशमुख यांनी समिती च्या माध्यमातून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा उभारला. चुलते यशवंतराव देशमुख, गौडवाडीचे ज्ञानोबा माळी, गडदे-पाटील, सरगर मंडळी नी भाई गणपतराव देशमुख यांना साथ दिली. त्यांच्या घरांना आणि जमिनीला योग्य मोबदला मिळवून दिला. इथूनच त्यांच्या राजकारणाचा श्री गणेशा झाला. याच दरम्यान सांगोला तालुक्यात शेकाप चळवळ चांगली रुजली होती.
रावसाहेब पतंगे, चव्हाण मास्तर, शंकरराव कुमठेकर, भाई ढोले, अब्दुल जमादार, पंढरीनाथ बाबर, दामू अण्णा शिंदे, तुकाराम पाटील, भानुदास बाबर, डॉ केळकर ई अनेक नेते होते. तो काळ स्वातंत्र्योत्तर होता. देशाला स्वातंत््रय मिळण्याच्या अगोदर महाराष्ट्रात सामाजिक चळवळीमधून शेकापचा जन्म झाला होता. शेकापने अनेक चळवळी उभ्या केल्या. गोवामुक्ती चळवळ, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, महागाई विरुद्धची चळवळ, आणीबाणी विरुद्धची चळवळ, शेतकऱ्यांना किफायतशीर भाव मिळावा म्हणून चळवळ, अश्या अनेक चळवळी केल्या.
1949 ला दाभाडी प्रबंध स्वीकारून शेकापने डाव्या विचारांचा पुरस्कार केला. 1961साली सांगोला येथे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वीर धरणाच्या पाण्यासाठी त्यांनी पाणी परिषद घेतली. 1970 साली नागज येथे वसंतराव दादा पाटील यांच्या उपस्थितीत पाणी परिषद घेतली. अश्या एक ना अनेक आंदोलनामध्ये ते अग्रक्रमाने कार्यरत राहिले. 1962 मध्ये सांगोला विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आलेल्या गणपतराव देशमुख यांनी तालुक्यावर आपल्या नेतृत्व आणि कर्तृत्वाने पकड मिळवली. 1978 ते 1979 या काळात ते पुलोद या शरद पवार यांच्या मंत्री मंडळात कृषीमंत्रीपदावर कार्यरत होते,1999 ते 2001 या काळात ते पणन आणि रोजगार मंत्री म्हणून कार्यरत राहिले.
कापूस एकाधिकार योजना मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याकडून जाहीर करून घेतली. शेतमजुराला किमान वेतन आणि रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून ते आग्रही राहिले. दुष्काळी भागातील तालुक्यांना अग्रक्रमाने पाणी मिळावे आणि समन्यायी पद्धतीने पाणी वाटप व्हावे. म्हणून काम करत राहिले. क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी, आर आर पाटील यांच्या साथीने दर वर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीला आटपाडी येथे पाणी परिषदा घेतल्या. टेम्भु म्हैशाळ योजनेसाठी सातत्याने पाठपुरावा केला. युती शासन काळात या योजना मार्गी लागल्या. 1978 साली मंत्रिमंडळात असताना नीरा उजवा कालवा फाटा क्रमांक 4/5 मंजूर करून घेतला. सांगोला तालुक्याच्या पिण्याच्या पाण्यासाठी महत्वाकांक्षी शिरभावी पाणी पुरवठा योजना तत्कालीन पाणी पुरवठा मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या मदतीने पूर्ण केली. 1980 साली शेतकरी सहकारी सूतगिरणी सुरू केली.
महिला सूतगिरणी ही सुरू केली. सांगोला तालुका शिक्षण प्रसारक शिक्षण मंडळ च्या माध्यमातून शैक्षणिक कार्य उभे केले. सांगोला विधानसभा मतदार संघातुन ते 11 वेळा आमदार म्हणून निवडून आले, एकच पक्ष-एकच व्यक्ती म्हणून त्यांचा नावलौकिक वाढला. महाराष्ट्राच्या विधानसभेत अनेक जनहिताचे कायदे झाले, विरोधी पक्षात राहूनही आपल्या अभ्यासू मार्गदर्शनाने त्यांनी महाराष्ट्राच्या विकासात भर घातली, विधानसभा अधिवेशनात त्यांनी सत्ताधारी पक्षाला नेहमी अनेक मुद्द्यावर सळो की पळो करून सोडले. केशवराव धोंडगे, दाजीबा देसाई, दत्ता पाटील, कृष्णराव धुळप, अण्णासाहेब गव्हाणे, प्रा एन डी पाटील यांनी विधानसभा गाजवून सोडली होती. विद्यापीठाची डी लीट सारखी पदवी असो अथवा महाराष्ट्र शासनाच्या जीवनगौरव पुरस्काराने ते तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते सन्मानित झाले आहेत. अनेक पुरस्कारांपेक्षा ते नेहमी जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय राहिले आहेत.
आपल्या चारित्र्याच्या आणि आचरणाच्या जोरावर ते महाराष्ट्राच्या राजकारणातील आदर्श ठरले आहेत, विधानसभेच्या कामकाजात जास्तीत जास्त वेळ उपस्थित राहून अभ्यास पूर्ण योगदान देणारा आणि जास्त वेळा निवडून येणारा लोक मनातला नेता म्हणून अख्खा महाराष्ट्र त्यांना ओळखतो.आबासाहेबांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. ( साभार)