गणेशोत्सव अपडेट! या मार्गावरुन प्रवास करणे त्रासदायक

। पोलादपूर । प्रतिनिधी ।

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्ग तातडीने एक मार्गिका पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. त्यावरुनच यावेळी गणेशभक्तांना प्रवास करावा लागणार आहे. यामुळे कशेडी घाटातील प्रवास हा खडतरच असणार आहे. महामार्गावरील तीन अपूर्ण पुलांपैकी दोन पुलांच्या कामांची नुकतीच सुरूवात झाली असताना हे काम थांबवून या पुलांच्या वरील बाजूस लालमातीचा भराव करून ही पर्यायी एक मार्गिका करण्याचे काम सुरू झाले आहे. या लेनला बिटूमिनचा थर लावण्याचा प्रयत्न पहिल्या पावसातच फसल्याने आता काँक्रीटीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे येत्या गणेशोत्सवाला कोकणात जाण्यासाठी मुंबईकडे जाण्यासाठीचा भुयारी मार्ग वापरात येण्याची शक्यता दिसून येत आहे.

गणेशभक्तांच्या वाहनांना यावेळी एक मार्गिकेवरून फक्त कोकणात जाता येणार असून गणेशोत्सव काळात कोकणातून मुंबईकडे जाणार्‍या वाहनांसाठी नेहमीचा खड्डेमय महामार्ग उपलब्ध राहणार आहे. प्रस्तावित 3.44 किलोमीटर लांबीचा बोगदा तयार करण्याचे काम रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने निविदा मंजूर झाल्याने स्विकारले असून 441 कोटी रुपयांचा खर्च याकामी होणे अपेक्षित आहे. खेड तालुक्यातील खवटी येथून 2019च्या पावसाळयापूर्वीच भुयारी मार्गाचे काम सुरू झाले. सह्याद्री पर्वतराजींचा कातळ फोडून कोकण रेल्वेचा करबुडे लोहमार्ग ज्याप्रमाणे बोगद्यातून नेण्यात आला. त्याप्रमाणेच खेड आणि पोलादपूर या दरम्यान हे दोन भुयारीमार्ग निर्माण करण्यास सुरूवात झाली आहे.

Exit mobile version