हेटकर आळी येथील गणेश मंदिर

। नेरळ । वार्ताहर ।

नेरळ गावातील सर्वात पहिले समजले जाणारे माघी गणेशोत्सव मंडळ विविध कार्याने सर्वांपर्यंत पोहचले आहे. माघी गणेशोत्सव साजरा करत असतानाच पुढे गणेश भक्तांच्या तयारीने या ठिकाणी भव्य गणेश मंदिर उभे राहिले आहे. दरम्यान, वरद विनायक महागणपती म्हणून हे मंदिर प्रसिद्ध असून सध्या या ठिकाणी माघी गणेशोत्सव सोहळा साजरा होत आहे.

नेरळ-माथेरान रस्त्यावर नेरळ गावामध्ये हेटकर आळी हि वस्ती आहे. या भागातील गणेश भक्तांनी 1981 मध्ये श्री गणेश जन्मउत्सव सोहळा आणि त्या निमित्ताने पाच दिवसांचे माघी गणेशोत्सव सोहळा आयोजित करण्यास सुरुवात केली. त्यावेळी ग्रामस्थांनी रमाकांत बाचम यांच्या नेतृत्वाखाली आप्पा मोडक, श्रीराम राणे, राजू हजारे, मधुकर मोडक, प्रवीण पोलकम, रवींद्र तरे, प्रवीण गायकवाड, धनाजी गरुड, संतोष मिसाळ, प्रकाश सावंत, प्रकाश पेमारे, अनिल मोडक यांच्या सारख्या अनेक ग्रामस्थांनी माघी गणेश उत्सव सोहळा सुरु केला.

श्रीराम राणे यांनी सर्वांना एकत्र करीत मंदिराची पायाभरणी केली. वर्षभरात मंदिर उभे राहिले आणि त्या मंदिरात 2006 मध्ये माघी गणेशोत्सव मंडळाच्या जागेवर उभारलेल्या मंदिरात वरदविनायक गणेशाची मूर्तीची प्रतिष्ठापना केली. त्या दिवसापासून या ठिकाणी गणेश मंदिरात अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात.

Exit mobile version