सांगोल्यांत ‘गणेशरत्न कृषी महोत्सव’

खा. शरद पवार, आ.जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती

| सांगोला | प्रतिनिधी |

सांगोला शहरात 19 ते 22 जानेवारी या कालावधीत राज्यस्तरीय मगणेशरत्न कृषी महोत्सव आयोजित करण्यात आले आहे. अनिकेत देशमुख युवा मंच, सांगोला यांच्या वतीने भरविण्यात येणारे कृषी महोत्सव डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय, सांगोला येथील मैदानात होणार असून, यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीसह कृषी क्षेत्रातील अनेक तज्ञ मान्यवर, उद्योजक आणि कृषी मित्र उपस्थित राहणार असल्याची माहिती, डॉ. अनिकेत देशमुख यांनी दिली.

आधुनिक शेती करीत असलेल्या भागातील भव्य प्रदर्शन, मल्टी मिडीया प्रसिध्दी, कृषी संबंधीत अनेक महत्वाच्या संस्थांचा सहभाग, वेगाने विकसित होणाऱ्या अत्यंत महत्वाच्या अशा ग्रामीण बाजारपेठेत प्रवेश, नवीन उद्योगधंद्यांच्या प्रचंड उलाढाली, शेतकरी ग्राहकांना थेट भेटण्याची सुवर्णसंधी, आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख शेतकऱ्यांना करुन देण्याची सुसंधी, थेट संवादाद्वारे शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्याची आणि त्यानुसार उत्पादनात बदल करण्याची संधी या महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार आहे,असे देशमुख म्हणाले.

पिकांच्या वाढीसाठी चर्चासत्र व परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. खते, जैविक खते आश्रितीच्या चीन पध्दती, कृषी अवजारे, यंत्रे, विषयक आधुनिक साहित्य बि-बियाणे, कृषी रसायने, फळ व फुले उत्पादनसंबंधीत विविध पध्दती व आधुनिक तंत्रज्ञान, अत्याधुनिक फवारणी यंत्रे, अत्याधुनिक हायटेक कृषी विभाग, ग्रीनहाऊस उभारणी, शेततळे व्यवस्थापन, दूध उत्पादन, पोल्ट्री इत्यादी विषयक यंत्रे व उत्पादने, कृषी अर्थसहाय्य व वितरण व्यवस्था, पशूपालन आणि पशू उत्पादने, शेतकऱ्यांना सहाय्यभूत ठरणाऱ्या सरकारी वा बिगरसरकारी संस्था, मत्स्योत्पादन व गांडुळशेती, ग्रामीण निवास व्यवस्था व त्यासाठी लागणारी उत्पादने, अन्नप्रक्रिया पॅकेजिंग स्टोरेज, वाहतुकीची कृषी उपयोगी वाहने, कृषीविषयक पुस्तके, नियतकालिके उपलब्ध होणार आहेत, असे देशमुख यांनी सांगितले.

शेतकऱ्यांची मानसिकता बदलून, त्यांच्या कुटुंबाला दिलासा मिळाला पाहिजे. शेती उद्योगाच्या नव्या तंत्राचा वापर करत कमीत कमी पाण्यामध्ये अधिक उत्पादन घेण्याचे प्रयत्न राज्यातील अनेक तरुण, प्रयोगशील शेतकरी करीत आहेत. आपल्या परिसरातही अशा शेतकऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. या कृषी महोत्सवामुळे सर्व शेतकऱ्यांपर्यंत एक चांगला संदेश पोहोचवावा आणि त्यांचा आत्मविश्वास वाढण्याबरोबरच नवी प्रेरणा मिळावी, नवीन प्रयोग करण्याचा उत्साह वाढवा हा हेतू आहे. असे देशमुख यांनी सांगितले.


शेतकऱ्यांनी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून आत्मविश्वासाने शेती उद्योगावर लक्ष केंद्रित करावे. शेतकरी कुटुंबातील शिक्षित तरुण मंडळींनी हा विषय गांभीर्याने घेऊन व पारंपरिक शेती बाजूला ठेवून नव्या तंत्राशी जोडून स्वावलंबी बनण्याचा प्रयत्न करून स्वर्गीय डॉ. मा.आमदार गणपतराव देशमुख साहेब यांच्या स्वप्नातला सांगोला तालुका निर्माण करण्यासाठी म गणेशरत्न कृषी महोत्सवफ आयोजित केला आहे.

डॉ. अनिकेत देशमुख
Exit mobile version