अनेक घटकांना रोजगार व उत्पन्नाची संधी; बाजारपेठांमध्ये उत्साहाचे वातावरण
| माणगाव | प्रतिनिधी |
गौरी गणपती उत्सव हा केवळ धार्मिक श्रद्धेपुरता मर्यादित न राहता ग्रामीण अर्थकारणाला नवी ऊर्जा देणारा उत्सव ठरतो. या काळात बाजारपेठांत उत्साहाचे वातावरण निर्माण होऊन शेतकरी, कारागीर, हस्तकला व्यावसायिक, फुलवाले, मिठाई विक्रेते, सजावटीची साधने बनवणारे अशा लहान मोठ्या व्यवसायिकासह अनेक घटकांना रोजगार व उत्पन्नाची संधी मिळते.
सांस्कृतिक कार्यक्रम, भजन, कीर्तन यामुळे सामाजिक ऐक्य वृद्धिंगत होते. अशा प्रकारे धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक स्थैर्याची अनोखी सांगड घालणारा हा गणेशोत्सव खऱ्या अर्थाने ग्रामीण जीवनाचा कणा बळकट करतो. यामुळे धार्मिक बरोबरच सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक स्थैर्य उंचवणाऱ्या गौरी गणपती उत्सवामुळे ग्रामीण अर्थकारणाला तेजी आली आहे.
गणेशोत्सव हा कोकणवासीयांच्या जीवनातील केवळ धार्मिक सोहळा नसून सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक उत्सव आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाच्या निमित्ताने माणगाव शहरातील बाजारपेठेला नवी झळाळी प्राप्त झाली आहे. कोकणातील बहुसंख्य कुटुंब नोकरी, व्यवसाय किंवा उद्योगधंद्यासाठी मुंबई, ठाणे, सुरत, पुणे तसेच इतर शहरांमध्ये स्थायिक झालेले असले तरी गणेशोत्सव, गौरी गणपती यांसारख्या सणांना ते आपल्या मूळ गावी परत आली आहेत.
या पारंपरिक ओढीमुळे माणगाव तालुक्यातील दुर्गम भागातील ही गावे अगदी गजबजून गेली आहेत. निजामपुर, विळे, इंदापूर, गोरेगाव, माणगाव येथील मंदावलेल्या बाजारपेठेत नवचैतन्य पसरले असून बाजारपेठेत लक्षणीय उलाढाल वाढली आहे.
माणगावातील बाजारपेठेत गेल्या कांही दिवसात झालेली उलाढाल या गोष्टीचे ठळक उदाहरण आहे. गणेशमूर्ती, सजावटीसाठी लागणारे साहित्य, फुलं, फळं, मिठाई, किराणा सामान यां सोबतच कपडे, भांडी, भेटवस्तू आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या विक्रीतही मोठी वाढ झाली आहे. उत्सवाच्या काळात सर्व वयोगटातील लोक खरेदीसाठी बाजारात गर्दी करीत असल्याचे चित्र पाहायला मिळते. व्यापाऱ्यांचे मंदावलेल्या व्यवहारांनी अचानक तेजी आली आहे. स्थानिक शेतकरी,
फुलबागायतदार, व व्यवसायिक, किरकोळ व्यापारी, तसेच हंगामी स्टॉलधारकांना यामुळे चांगला फायदा झाला. तसेच गणेशोत्सवामुळे केवळ आर्थिक उलाढाल वाढली असे नाही, तर गावोगावी आनंद, एकोपा आणि नातेवाईकांमधील जवळीकही वाढली आहे. मुंबई, ठाणे, पुणे अशा शहरांमधून कोकणात परतणाऱ्या कुटुंबांनी घराघरांत उत्सवाची रंगत वाढवली आहे.
आप्तेष्टांच्या भेटीगाठी, एकत्र जेवणावळी, भजन, कीर्तन, आरत्या यामुळे गावात वेगळेच मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे. माणगाव शहर हे दक्षिण रायगडचा केंद्रबिंदू असल्याने येथील बाजारपेठ नैसर्गिकरीत्या आजूबाजूच्या गावांना आधार देते. त्यामुळे उत्सव काळात येथील आर्थिक उलाढालीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. स्थानिक व्यावसायिक, दुकानदार आणि हॉटेल व्यवसायिकांमध्ये उत्साह संचारला असून, वर्षभरातील मोठा महसूल या दिवसांत मिळतो.
