गणेशोत्सवातही मिळणार आनंदाचा शिधा

वेळेत शिधा मिळावा, लाभार्थ्यांची मागणी

। अलिबाग । प्रतिनिधी ।

गणेशोत्सवामध्ये शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. रायगड जिल्ह्यातील चार लाख नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे. मात्र गोरगरीबांना सणासुदीच्या काळात शंभर रुपयांत आनंदाचा शिधा देण्याच्या बाता मारणार्‍या सरकारकडून वेळेवर शिधा पोहचत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे यंदा गणेशोत्सवात मिळणारा शिधा वेळेवर मिळेल का असा सवाल रायगडकरांनी उपस्थितीत केला आहे. गेल्या वर्षभरापासून आनंदाचा शिधा देण्याचा उपक्रम शासनाने सुरु केला आहे. यंदाही गणेशोत्सवाच्या कालावधीत शिंदे फडणवीस सरकारने आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेतला होता. शिधापत्रिका धारकांनना गौरी, गणपतीच्या कालावधीत रवा, चणाडाळ, साखर आणि तेल 100 रूपयांत दिले जाणार आहे.

गोरगरीबांना गणेशोत्सवामध्ये सण उत्साहात साजरा करता यावा यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. रायगड जिल्ह्यामध्ये आनंदाचा शिधा या योजनेचेे सुमारे चार लाख लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा या योजनेचा लाभ गणेशोत्सवामध्ये मिळणार आहे. परंतु गेल्या वर्षभरापासून सुरु झालेल्या या योजनेचा बोजवारा अनेक वेळा उडाल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे. साखर आहे, तर तेल नाही, डाल आहे, तर रवा नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यात सण उत्सव संपून अनेक दिवस उलटून गेले तरीही अनेकांना आनंदाचा शिधा वेळेवर मिळाला नसल्याच्या तक्रारी जिल्हा स्तरावर करण्यात आले आहे. नियोजनचा अभाव असल्याने हा प्रकार गेल्या वर्षभरापासून सुरु आहे. आनंदाचा शिधा ही योजना सर्वसामान्यांसाठी आनंद देणारी असली, तरीही सणासुदीत आनंदाचा शिधा मिळत नसल्याने सर्वसामान्य शिधापत्रिका धारकांच्या घोर निराशा झाल्या आहेत. त्यामुळे गणेशोत्सात सुरु करण्यात येणारी आनंदाचा शिधा वेळेवर मिळावी अशी मागणी नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

गुढीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सरकारने आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र गुढीपाडवा व आंबेडकर जयंती सोहळा पुर्ण होऊन देखील अनेक दिवस उलटली, तरीही आनंदाचा शिधा मिळाला नाही. त्यामुळे खुप मोठी निराशा झाली होती. सरकारने यंदा गणेशोत्सवात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेतला असला, तरीही तो वेळेवर मिळावा हीच अपेक्षा आहे.

जयवंत तांबडकर – सुडकोली

शासनाने गौरी गणपतीच्या काळात आनंदाचा शिधा देण्याची घोषणा केली आहे. शासनाच्या सुचनेनुसार त्याचे योग्य पध्दतीने नियोजन केले जाणार आहे. धान्य वेळेवर देण्याचा प्रयत्न केला जाईल.

विठ्ठल इनामदार – प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी
Exit mobile version