दुचाकी चोरांच्या टोळीचा पर्दाफाश

मुख्य आरोपीसह दोन अल्पवयीन ताब्यात; 65 हजारांच्या दोन दुचाकी जप्त

| कर्जत | प्रतिनिधी |

नेरळ परिसर आणि कर्जत तालुक्यातून दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा नेरळ पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी एका तरुणाला अटक केली असून, त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून 65 हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे नेरळ व कर्जत पोलीस ठाण्यातील दुचाकी चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.

नेरळ परिसरातून टीव्हीएस एन्टॉर्क-125 स्कुटी चोरीला गेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे यांच्या पथकाने तपास सुरू केला. गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे इलिया फ्रान्सिस मिरांडा (18, रा. अंबरनाथ) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्याने दोन अल्पवयीन साथीदारांसह दुचाकी चोरी केल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याकडून नेरळ हद्दीतील एन्टॉर्क स्कुटी आणि कर्जत हद्दीतील होंडा डिओ अशा दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक सुशांत वरक, हवालदार सचिन वाघमारे, पोलीस अंमलदार राजेभाऊ केकान, आशु बेंद्रे आणि विनोद वांगणेकर यांच्या पथकाने केली.

Exit mobile version