दौघाजणांना अटक, दोघे फरारी
| मुंबई | प्रतिनिधी |
कामावरून घरी परतणार्या तरुणीवर चार नराधमांनी बलात्कार केल्याची घटना मुंबईत घडली असून या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. तर आणखी दोन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. शिवाजीनगर परिसरात राहणारी 19 वर्षांची तरुणी केटरिंगचे काम करते. शनिवारी पहाटे साडे चारच्या सुमारास पीडित तरुणी कामावरुन घरी परतत होती. शिवाजीनगर येथील जुन्या बस डेपोजवळून जात असताना तरुणीला चार जणांच्या टोळक्याने गाठले आणि चौघांनी पीडितेवर सामूहिक बलात्कार केला. बलात्कारानंतर नराधमांनी घटनास्थळावरून पळ काढला. शेवटी पीडितेने कसेबसे पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरूवात केली. दुसरीकडे चार पैकी दोन आरोपी उत्तर प्रदेशला पळून जाण्याच्या तयारीत होते. मात्र, तोवर मुंबई पोलिसांच्या पथकाने डोंगरी परिसरातून त्यांना अटक केली. या घटनेतील अन्य दोन आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.