। पुणे । प्रतिनिधी ।
एसटी बसमधून गांजाची तस्करी करण्याचा डाव खडकी पोलिसांनी हाणून पाडला. पोलिसांनी जळगाव येथील दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून साडेदहा किलो गांजा जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकी पोलिसांचे एक पथक गस्तीवर असताना पोलिस अंमलदार ऋषिकेश दिघे यांना शिरपूर येथून एसटी बसमधून दोघेजण गांजा घेऊन पुण्याकडे येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार खडकी पोलिसांनी त्या एसटी बसच्या मार्गाची माहिती घेतली. त्यानंतर जुना मुंबई-पुणे महामार्गावरील चर्च चौकात सापळा रचून बस थांबवली. पोलिसांनी जाबीर भिकन खाटीक (32, रा. वाघाडी, ता. शिरपूर, जि. धुळे) आणि सुहेल अली जहीर अली शहा (26, रा. चोपडा, ता.जि. जळगाव) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक लाख 60 हजार रुपयांचा 10 किलो 610 ग्रॅम गांजा जप्त केला. या दोघांविरुद्ध खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ निरीक्षक सतीश जगदाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गजानन चोरमले, पोलीस उपनिरीक्षक अण्णा गुंजाळ, पोलीस अंमलदार ऋषिकेश दिघे, संदेश निकाळजे, प्रताप केदारी, आशिष पवार यांनी ही कारवाई केली.
एसटी बसमधून गांजाची तस्करी; दोघेजण ताब्यात
