पीओपी बंदीपेक्षा गणपती मुर्ती उद्योगाकडे रोजगार म्हणून पहावे

। पेण । संतोष पाटील ।
पेण हा तालुका गणेश मुर्तीसाठी जगविख्यात आहे. परंतु गेली आठ नऊ वर्षापासून पीओपी गणेश मुर्तीवर बंदी अशा प्रकारच्या बातम्या साधारणतः ऑगस्ट, सप्टेंबरच्या सुमारास ऐकायला मिळतात. पीओपी वरील बंदी हा विषय ऐरणीवर येतो. म्हणूनच थोडासा पेण तालुक्यातील गणपती व्यवसाय आणि त्यापासून मिळणारा रोजगाराकडे ही लक्ष देणे गरजेचे आहे. साधारणतः वर्षातील 11 महिने गणपती कारखानदारीतून रोजगार उपलब्ध होतो. साधारणतः वर्षाला लाखाच्या आसपास रोजगार निर्मितीचा एकमेव उद्योग हा गणपती व्यवसाय उद्योग आहे. या उद्योगावर काम करणारे लाखो युवक आपल्याला पेणसह पूर्ण महाराष्ट्रात मिळतील. पेणचा विचार केल्यास 40 ते 50 हजार युवकांना या व्यवसायातून रोजगार उपलब्ध होते आहे. शिवाय या गणपती व्यवसायामुळे इतरही अनेक रोजगाराच्या संधी निर्माण होतात.आज पेण तालुक्याचा विचार करता पूर्ण आर्थिक कणा हा गणपती व्यवसायावर आहे. वर्षाला 100 ते 150 कोटींची उलाढाल या व्यवसायातून होते.

प्रदुषण मंडळाला पीओपीला बंदी घालायची असेल तर घालावी. परंतु या पीओपीवर रासायनिक रिसर्च ही होणे गरजेचे आहे. पीओपीपासून किती प्रमाणात प्रदुषण होते. याची टक्केवारी देखील काढणे गरजेचे आहे. लाखोने रोजगार उपलब्ध होत असेल तर पीओपीच्या ऐवजी अथवा पीओपीवर प्रक्रिया करून असे काही तरी शोधून काढावे.पीओपीवर बंदी घालायची असेल तर जरूर घाला परंतु त्या अगोदर आम्हाला 2 ते 3 वर्ष स्थिर व्हायला वेळ द्या. दरवेळेला सरकार बदलला की, पॉलिसी बदलते एकदाचा निर्णय घेउनच टाका. गणेश मुर्ती हा भावनेशी निगडीत असल्याने आज गणेश भक्तांची गणेश मुर्तीसाठी मोठया प्रमाणात मागणी आहे. परंतु कारखानदार द्बिधा मनस्थितीत असल्याने कामाचा वेग सुध्दा मंदावत आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने पीओपी वर बंदी घातलेली आहे. तर दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेने अटी शर्तीवर पीओपीच्या गणेश मुर्तींना परवानगी दिली आहे.

काही दिवस चर्चा होते. मात्र निर्णय काहीच लागत नाही. आम्हा कारखानदारांचे म्हणणे आहे की, जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य आहे. परंतु, तो निर्णय तरी आम्हाला दया.

– श्रीकांत देवधर, प्रसिध्द मुर्तीकार, पेण

गणपती कारखानदारीमध्ये तरुणांना रोजगाराची उत्तम संधी आहे. मात्र शासनाने आपला काय निर्णय आहे तो लवकरात लवकर सांगावा अथवा जाहिर करावा. त्या प्रमाणे आम्हाला व्यवसायात बदल करता येतील. मात्र येवढ नक्की की शासनाने गणपती कारखान्याकडे उद्योग धंदा म्हणून पहावे.

– दिलीप लाड, माजी उपनगराध्यक्ष तथा गणपती मुर्तीकार
Exit mobile version