माथेरान मार्गावर कचर्‍याची ढिगारे

| पनवेल । वार्ताहर ।

माथेरान मार्गावरील सुकापूर, आकुर्ली ग्रामपंचायत क्षेत्रातील अनेक दुकानदार, फळ विक्रेते, खाद्यपदार्थांची विक्री करणारे व्यावसायिक रस्त्याच्या कडेला, नदीकिनारी कचरा टाकतात. तसेच रात्रीच्या वेळी हा कचरा जाळलाही जातो. कचर्‍याच्या धुरामुळे रहिवासी त्रस्त झाले आहेत.

पनवेल तालुक्यातील खेडेगावात शहरीकरणाचे वारे वाहू लागले आहेत. माथेरान मार्गावर सुकापूर ते नेरे परिसरात मोठ्या प्रमाणात निवासी संकुल निर्माण झाली आहेत. रस्त्याच्या दुतर्फा विविध खाद्यपदार्थांची, गृहोपयोगी वस्तूंची दुकाने थाटली आहेत. या दुकानांवर ग्राहकांची नेहमीच गर्दी असते. यापैकी अनेक दुकानदार ओला आणि सुका कचरा रस्त्याकडेला टाकत आहेत. हॉटेल, ढाबे, चायनीजच्या गाड्यावरील ओला कचरा आकुर्ली, हरिग्राम परिसरात आणून टाकला जात आहे. हरिग्रामजवळून जाणार्‍या गाढी नदीकिनारी या कचर्‍याचा ढीग लागला आहे. प्लास्टिकच्या पिशव्या, दारूच्या बाटल्या सर्रासपणे टाकण्यात येत आहेत. त्यामुळे नदीपात्रात प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे. रात्रीच्या वेळी कचरा जाळण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या निवासी वस्तीतील नागरिकांना या धुराचा त्रास सहन करावा लागत आहे.

Exit mobile version