अलिबाग शहरात कचऱ्याचे साम्राज्य

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

| अलिबाग | प्रमोद जाधव |

अलिबाग शहरात ठिकठिकाणी स्वच्छ अलिबाग सुंदर अलिबागचे फलक लावण्यात आले आहेत. मात्र शहराची स्वच्छतेबाबत अवस्था बिकट झाल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.

अलिबाग शहराची लोकसंख्या सुमारे तीस हजारहून अधिक आहे. शहर पर्यटनाच्यादृष्टीने महत्वाचे ठरत असताना अलिबाग जिल्ह्याचे ठिकाण आहे. या ठिकाणी वेगवेगळी शासकिय, खासगी कार्यालये आहेत. पर्यटनासाठी अलिबागमध्ये येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पर्यटकांना चांगल्या सुविधा मिळाव्या यासाठी पालिकाकडून प्रयत्न केला जात आहे. शहरातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहवे यासाठी शहरातील स्वच्छता राखण्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा तयार करण्यात आली आहे. काही कायम स्वरुपी व काही कंत्राटी कामगारांची सफाई कामगार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. स्वच्छतेसाठी लाखो रुपयांचा खर्च नगपालिकेकडून केला जातो. मात्र शहरातील स्वच्छता बिनभरोसे अशी झाली आहे. शहरात प्रवेश केल्यावर ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे आहेत. स्वच्छ अलिबाग सुंदर अलिबागची जाहिरातबाजी फक्त नावापुरताच राहिल्याचे चित्र दिसून येत आहे.

नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाचे शहरातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे. त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शहरातील अनेक भागात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे अन्य आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या दोन वर्षापासून शहराचा कारभार प्रशासनाच्या भरोवश्यावर आहे. त्यामुळे शहरातील स्वच्छतेबाबत मुख्याधिकारी अंगाई साळुंखे यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

Exit mobile version