माथेरानमध्ये कचर्‍याचे साम्राज्य

नगरपरिषदेचे अक्षम्य दुर्लक्ष

| माथेरान | वार्ताहर |

नगरपरिषदेच्या माध्यमातून दरवर्षी लाखो रुपयांची उधळण केवळ स्वच्छतेवर केली जात आहे. परंतु, एकदा का याबाबत टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली की ठेकेदारसुद्धा काही लक्ष देत नसून, दर महिन्याला कामाची बिले घेण्यासाठी आतुर असतात. घनकचरा व्यवस्थापनासाठी तर काही कोटींच्या घरात ठेका दिला जातो; परंतु त्याप्रमाणे कामे पूर्ण केली जात नाहीत, त्यामुळे माथेरानमध्ये कचर्‍याचे साम्राज्य पसरले आहे, असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

संबंधित ठेकेदाराला वेठीस धरून काही मंडळी आपले उखळ पांढरे करण्यात व्यस्त दिसतात. नेमून दिलेली कामे योग्य पद्धतीने केली जात आहेत किंवा नाही यावर अंकुश ठेवण्यासाठी नगरपरिषदेचा अधिकारी वर्ग हतबल दिसत आहे. मागील काळात नगरपरिषदेने अनेकदा स्वच्छता अभियानात पारितोषिक प्राप्त केलेल्या या गावात सद्यःस्थितीत स्वच्छता लोप पावत चालली आहे. विविध पॉईंट्स त्याचप्रमाणे महत्त्वाच्या ठिकाणी प्लास्टिक बाटल्या तसेच रॅपेर्स जंगलात इतस्ततः पडलेले असते. सर्वच भागात कचराकुंड्या नसल्याने नाईलाजाने पर्यटक आपल्याजवळील प्लास्टिक कचरा आजूबाजूच्या जंगलात टाकत असतात. त्यामुळे इथली वनराई हळूहळू संपुष्टात येत आहे. इथले पर्यावरण अबाधित राहण्यासाठी स्वच्छता राखणे खूपच गरजेचे आहे, त्यासाठी नगरपरिषदेच्या अधिकारी वर्गाने एक महत्त्वपूर्ण जबाबदारी म्हणून लक्ष केंद्रित केल्यास इथली वनराई आणि निसर्ग सौंदर्य कायमस्वरूपी हरित राहील, असे नागरिकांमधून बोलले जात आहे.

नगरपरिषदेने दरवर्षी घनकचरा व्यवस्थापन ठेका संबंधित ठेकेदाराला देऊन एकप्रकारे ठेकेदाराला आणि त्यावर अवलंबून असणार्‍या काही मंडळींना पोसण्यासाठी हा ठेका काढला जातो की काय? त्यापेक्षा एकवेळ येथील स्वच्छतादूत म्हणून कायम निःस्वार्थीपणे स्वच्छता मोहीम राबवितात अशांना ही कामे दिल्यास नगरपरिषदेची मोठ्या प्रमाणावर आर्थिक बचत होऊ शकते. त्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.
Exit mobile version