| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन नगर परिषदेने श्रीवर्धन शहरातील कचरा उचलण्याचे, गटारे साफ करण्याचे व समुद्र किनारपट्टीवरील साफसफाई करण्याचे कंत्राट एका खाजगी कंपनीला दिले होते. सदर कंपनीच्या निविदेची मुदत संपल्यामुळे मागील दोन महिन्यांपासून हे काम बंद पडले होते. परंतु, आता नवीन निविदा मंजूर झालेली असून कामाची वर्क ऑर्डर सुद्धा देण्यात आलेली आहे. कंत्राटी सफाई कामगार कामावर हजर झाल्याचे चित्र शहरामध्ये पाहायला मिळत आहे. परंतु, असे असतानाही श्रीवर्धन समुद्रकिनारा हा पूर्णपणे अस्वच्छ झालेला असून, त्याची योग्य पद्धतीने सफाई लवकरात लवकर करून घ्यावी अशी मागणी पर्यटकांसह नागरिकांमधून केली जात आहे.
श्रीवर्धन समुद्रकिनारी सुशोभित असा धूप प्रतिबंधक बंधारा बांधलेला आहे. सदर बंधाऱ्यावरती गेले कित्येक दिवसात झाडू मारलेला नसल्यामुळे वाळू पसरलेली आहे. त्याचप्रमाणे पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, प्लास्टिकच्या पिशव्या, इतर कचरा, खाद्यपदार्थांचे कंटेनर्स, प्लास्टिकचे ग्लास व फुटलेल्या बिअरच्या बाटल्या यांचा खच पडलेला पाहायला मिळतो. तर किनारपट्टीवर असलेल्या वाळूच्या भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर पाण्याच्या बाटल्या, प्लॅस्टिकच्या पिशव्या यांचा कचरा जमा झालेला आहे. सदरचा कचरा उचलण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेली मशीन देखील नगरपरिषदेने आणलेली आहे. परंतु, सदर मशीनचा वापर हा अत्यंत कमी प्रमाणात होत असल्याने किनारपट्टीवरील कचरा तसाच आहे.
मागील अनेक दिवसांपासून श्रीवर्धन नगर परिषदेची निवडणूक झालेली नव्हती व प्रशासकीय कारभार सुरू होता. त्या काळात स्वच्छतेची परिस्थिती अत्यंत चांगली होती. परंतु, निवडणूक होऊन आता नवीन बॉडी बसून सुद्धा बेजबाबदार लोकप्रतिनिधींमुळे श्रीवर्धन शहरात कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले पाहायला मिळते. याबाबत श्रीवर्धन नगर परिषदेचे मुख्याधिकारी विराज लबडे यांच्याकडून माहिती घेतली असता, कचरा उचलण्याच्या कामाची वर्कऑर्डर दोनच दिवसांपूर्वी दिलेली असून, लवकरच कामगार कामावर रुजू होऊन शहर स्वच्छ करतील असे सांगण्यात आले.
श्रीवर्धन समुद्रकिनारी कचऱ्याचे साम्राज्य
