गावातील कचरा रस्त्यांवर

| पनवेल । वार्ताहर ।
पनवेल शहरालगत असलेल्या ग्रामपंचायतीकडे कचर्‍याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था नसल्याने हा कचरा परिसरातील नदीपात्रालगत, महामार्ग तसेच रस्त्याच्या कडेला टाकला जात आहे. त्यामुळे या परिसराला डम्पिंग ग्राऊंडचे स्वरूप आले असून ठोस उपाययोजनांअभावी गावांमधील कचर्‍याचा प्रश्‍न अधिकच जटिल बनला आहे. सिडको कॅालनीव्यतिरिक्त बांधकाम व्यावसायिकांनी तालुक्यातील विविध गावांमध्ये जागा घेऊन इमारती उभारल्या. अनेक इमारतींना बिनशेती तसेच टाऊन प्लॅनिंगची परवानगी मिळाली आहे. संबंधित विभागांकडून डोळे झाकून गृहसंकुलाकरिता हिरवा कंदील दिला. याशिवाय ग्रामपंचायतींकडून घरबांधणी परवानगी घेऊन कित्येक बांधकाम व्यावसायिकांनी इमारती बांधल्या आहेत. बजेटनुसार घर मिळाल्याने अनेकांनी ग्रामपंचायत हद्दीत घरे घेतली आहेत.

त्यामुळे नेरे, वाकडी, मोर्बे, सुकापूर, आकुर्ली, विचुंबे, पळस्पे, देवद, उसर्ली, कोन, कोळखे, पळस्पे, मोह, शिवकर, कोप्रोली, पोयंजे, चिखले व इतर गावांचे नागरिकरण झाले आहे, पण या गावांमधील वाढलेल्या लोकसंख्येमुळे त्याच प्रमाणात निर्माण होणार्‍या कचर्‍यामुळे गाव परिसरामधील स्वच्छतेचा अक्षरश: बोजवारा उडाला आहे. काही ग्रामपंचायतींनी गावातील कचरा गोळा करण्याची व्यवस्था केली आहे, पण या कचर्‍यावर प्रक्रिया करण्याची व्यवस्था ग्रामपंचायतींकडे नसल्याने बहुतांश ग्रामपंचायती आपला कचरा मोकळा भूखंड, महामार्गालगत किंवा नदी किनार्‍यावर टाकत आहे.

महामार्गावर अपघातांना निमित्त
गाढी आणि काळुंद्रे नदीच्या पात्रात कचरा दिवसाढवळ्या टाकला जात आहे. या कचर्‍यामुळे नदीचे पाणी दूषित होत आहेत. त्याचा परिणाम पाण्यातील जलचरांवर होत आहे. पळस्पे परिसरातील कचरा मुंबई-गोवा महामार्गाच्या कडेला टाकून तो पेटवून दिला जात आहे. नेरे परिसरात निर्माण होणार्‍या कचर्‍याचेही मोकळ्या जागेत ढीग केले जात आहेत. त्यामुळे मोकाट गुरांचा महामार्गावरील वावर वाढला असून अनेकदा अपघातांनाही हा कचरा जबाबदार ठरला आहे.

Exit mobile version