| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत नगरपरिषदेच्या वतीने ‘स्वच्छ भारत सर्वेक्षण’ अंतर्गत शहर परिसरात फलकबाजीतून उपक्रमाचा गाजावाजा होत असताना शहराची ओळख असलेला कर्जतमधील विठ्ठल नगर सध्या कचऱ्याच्या समस्येमुळे त्रस्त आहे.
परिसरात गेल्या दोन दिवसांपासून घंटागाडी न फिरकल्याने नागरिकांनी अखेर घरातला कचरा मोकळ्या जागेत टाकण्यास सुरुवात केली आहे. सध्या कर्जत नगर परिषदेमध्ये निवडणुकीचा प्रचाराची धामधूम जोरात सुरू आहे. प्रशासन निवडणुकीच्या यंत्रणेमध्ये गुंतले आहेत, यामुळे प्रशासनाचे बाकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष होत आहे. नगरपरिषदेने ज्या ठेकेदाराला घंटागाडीचा ठेका दिला. त्या ठेकेदाराचे कामाकडे लक्ष नाही असे नाव न छापण्याच्या अटीवर तिथे काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांनी सांगितले.
नगरपरिषद प्रशासनाच्या नियमानुसार ओला आणि सुका कचरा हा वेगळा करूनच घंटागाडीला द्यावा लागतो त्यामुळे घरात कचरा साठल्याने कुबट वास येत आहे. अखेर घरात कचरा किती दिवस ठेवायचा म्हणून चौकातील मोकळ्या जागेत हा कचरा टाकला जात असल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसत आहे. अनेक नागरिक मॉर्निंगला जाताना कचरा साठलेली पिशवी हातात घेऊन मिळेल त्या ठिकाणी टाकतात कर्जत टेकडीवर अनेक नागरिकांचे मॉर्निंग वॉकचे ठिकाण आहे. त्या ठिकाणी तर एवढ्या मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे, याचे चित्र हे कर्जतला विदारक आहे. विठ्ठलनगर परिसरात फिरणाऱ्या घंटागाडीच्या ठेकेदाराच्या मुकादामाकडे संपर्क साधला असता त्यांनी सांगितले दोन दिवस ठेकेदाराची माणसं बाजारपेठेत रात्रीच्या सुमारास पडलेला कचरा उचलत नसल्याने सकाळी सर्व कचरा आम्हाला भरावा लागत आहे, त्यामुळे घंटागाड्या त्याच ठिकाणी भरतात त्यामुळे अन्य ठिकाणी गाड्या फिरवल्या जात नाही असे सांगितले.







