रोह्यात स्वच्छतेबरोबर आरोग्याची ऐशीतैशी; सुशिक्षित वर्गाकडूनच नियम धाब्यावर
| धाटाव | प्रतिनिधी |
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत गाव, वाड्या आणि शहरांमध्ये स्वच्छतेचा जागर केला जात आहे. नगर पालिकेपासून ग्रामपंचायतीपर्यंत सर्वच स्तरांवर कचरा संकलनासाठी घंटागाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. रोहा शहरासह परिसरात दररोज सकाळी घंटागाडीचा आवाज गल्लोगल्ली घुमत असला, तरी प्रत्यक्षात चित्र काही वेगळेच दिसत आहे. येथील अनेक भागांत नागरिकांकडून अजूनही उघड्यावर कचरा फेकला जात आहे. सुशिक्षित वर्गाकडूनच स्वच्छतेचे नियम धाब्यावर बसवले जात असल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे. त्यामुळे स्वच्छतेबरोबर आरोग्याची ऐशीतैशी झाल्याचे वास्तव समोर येत आहे. यावर कुंडलीका बचाव समिती व निसर्गप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे.
सध्या रोहा-कोलाड रस्त्यावर रोठखुर्द गावाला लागून वाहणाऱ्या आंबा नदीत पहाटेपासून औद्योगिक वसाहतीत कामानिमित्त तसेच मॉर्निंग वॉकसाठी जाणारी सुशिक्षित माणसे आपल्या घरातील कचरा नदीवरील पुलावरून आणि रस्त्याच्या कडेला प्लास्टिकच्या पिशव्यांमधून फेकून देत आहेत. याठिकाणी टाकलेला कचरा हा रोठखुर्द पुलानजिक आंबा नदीला जोडलेल्या कुंडलिका नदीपात्रात साचत आहे. तर, काही महाभाग पुलाच्या डाव्या बाजूला रस्त्यालगत फिरकावून देताना दिसतात. काही नोकरदार नागरिकांच्या मते, घंटागाडी येण्याची वेळ आणि त्यांच्या ऑफिसची वेळ जुळत नाही. त्यामुळे घरात कचरा साठण्यापेक्षा तो बाहेर फेकण्याकडे त्यांचा कल असतो. रोहे शहरात आणि बहुतांशी गावोगावी अनेक घरांमध्ये अजूनही कचरा वर्गीकरण केले जात नाही. घंटागाडी कर्मचारी मिश्र कचरा स्वीकारत नसल्याने वादाचे प्रसंग उद्भवतात. परिणामी तो कचरा उघड्यावर टाकला जातो. पहाटेच्या वेळी आलिशान गाड्यांमधून कचऱ्याच्या पिशव्या रस्त्याच्या कडेला भिरकावल्या जात असल्याचे धक्कादायक चित्र नजरेस पडत आहे. सुशिक्षित वर्गाच्या या प्रतापामुळे रोहा-कोलाड रस्त्यालगत दोन्ही बाजूला प्लास्टिकच्या पिशव्यांचा खच पडलेला दिसून येत असून काही ठिकाणी प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. तसेच, कचऱ्यामुळे रस्त्यालगतचा परिसर बकाल झाला असून डंपिंग ग्राउंडचे स्वरूप आले आहे.
उघड्यावर टाकलेल्या या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरत असून डासांचे देखील प्रमाण वाढले आहे. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनियासारख्या आजारांचा धोका वाढला आहे. तसेच, भटक्या कुत्र्यांचा वावर देखील अशा ठिकाणी जास्त असल्याने पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. विशेषतः पावसाळ्यात हा कचरा वाहून नाल्यांमध्ये अडकल्याने पाणी साचण्याच्या प्रचंड समस्या उद्भवतात. केवळ घंटागाड्या फिरवून किंवा नियम बनवून स्वच्छता येणार नाही. त्यासाठी नागरिकांनी आपली मानसिकता बदलणे गरजेचे आहे. ‘आपला कचरा आपली जबाबदारी’ हा विचार जोपर्यंत प्रत्येक मनात रुजत नाही, तोपर्यंत गाव आणि शहरे खऱ्या अर्थाने कचरामुक्त होणार नाहीत. घराची स्वच्छता राखणारे नागरिक सार्वजनिक रस्ते मात्र अस्वच्छ करत आहेत. डिग्री हातात असूनही नागरीक शिस्तीचा अभाव असणे, ही शहरासाठी चिंतेची बाब ठरत आहे. केवळ साक्षर होणे म्हणजे सुशिक्षित होणे नव्हे; सार्वजनिक स्वच्छतेचे भान राखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आता केवळ दंड आकारून चालणार नाही, तर या वर्गाची मानसिकता बदलण्यासाठी व्यापक जनजागृतीची गरज निर्माण झाली आहे.
कुंडलिका नदी प्रदुषणमुक्त ठेवणे ही जशी शासनाची जबाबदारी आहे, तशीच नागरीकांची सुद्धा आहे. नदीलगत असलेल्या रस्त्याचा उपयोग बरेचजण आपल्या सोयीप्रमाणे घरगुती कचरा फेकून देण्यासाठी करताना दिसतात. कधी कधी तर डंपिंग झाल्यासारखे नदीचे पात्र दिसते. अशा ठिकाणी सीसी कॅमेरे लावून कचरा टाकणाऱ्यांना रंगेहाथ पकडले पाहिजे आणि कठोर कारवाई केली गेली पाहिजे.
– दिलीप वडके, सदस्य, कुंडलिका बचाव संघर्ष समिती रोहा
रोहा-कोलाड रस्त्यालगत असलेल्या पुलाअगोदरची बाजूही जे महाभाग दुचाकीवरून कचरा टाकतात ही वरसे ग्रामपंचायत हद्दीमध्ये येते. त्यामुळे येथील सरपंच, ग्रामसेवक यांनी त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. पुलाजवळ जी लोकं कचरा टाकतात त्यामुळे तिथे डुकरे, कुत्रे कचऱ्यात टाकलेले अन्न खायला येतात आणि मग पुलावर प्रवासाच्या अंगावर हल्ला करतात. दुचाकीवर बसून पुलावरून कचरा फेकून कुंडलिका नदीचे विद्रुपीकरण करणाऱ्यांना यापुढे चांगलाच धडा शिकविण्यात येईल.
– सचिन मोरे, पर्यावरणप्रेमी, रोहा
