फलकाच्या बाजूलाच कचर्याचा ढीग
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन शहराचे प्रवेशद्वार समजल्या जाणार्या आराठी ग्रामपंचायत हद्दीत गोखले महाविद्यालयाच्या फाटकासमोरच रस्त्याच्या कडेला कचर्याचा ढीग साठला असून, आराठी येथील नागरिकांसाठी घनकचरा व प्लॅस्टिक रस्त्यावर टाकू नये, टाकल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा आराठी ग्रामपंचायतीकडून फलक लावण्यात आलेला आहे. परंतु, ग्रामपंचायतीच्या फलकाखालीच प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा ढीग बघावयास मिळत असून, आराठी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या फलकाला केराची टोपली दाखवली आहे.
श्रीवर्धन तालुक्यातील 2755 लोकसंख्या आराठी ग्रामपंचायत हद्द ही श्रीवर्धन शहराचे प्रवेशद्वार समजले जाते. आराठी ग्रामपंचायत हद्दीतील कॉम्प्लेक्स, व्यापारी गाळे यांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात असून, नागरिक होणार्या घनकचर्याची आपल्या परिसरात विल्हेवाट न लावता ओसाड जागेवर कचरा, प्लॅस्टिक पिशव्या टाकून देतात. श्रीवर्धन-बोर्लीपंचतन मार्गावरील गोखले महाविद्यालय फाटकासमोरील गटार हे आराठी येथील ग्रामस्थांनी कचरा टाकण्याचे ठिकाण समजले असून, ग्रामस्थांकडून वारंवार त्याच ठिकाणी कचरा टाकण्याच्या वृत्तीमुळे ग्रामपंचायतीकडून रितसर सूचना फलक लावण्यात आलेला आहे. परंतु, त्या फलकाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत फलकाच्या आजूबाजूलाच ग्रामस्थ कचरा टाकत आहेत.
गोखले महाविद्यालयाच्या फाटकासमोरच टाकलेला कचरा पूर्णपणे कुजलेला असून, विद्यार्थ्यांना फाटकातून महाविद्यालयात प्रवेश करताना व बाहेर पडताना दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे, त्याचप्रमाणे आजूबाजूच्या खेडेगावातील रहिवाशांना या दुर्गंधीमय रस्त्यावरून जाताना त्रासदायक होऊ लागले आहे. काही दिवसांपूर्वी शिळे खाद्यपदार्थ टाकलेली पिशवी कुत्रा तोंडात घेऊन जात असताना कुत्रा दुचाकीस्वाराच्या मध्ये आल्याने दुचाकीस्वार खाली पडून किरकोळ जखमी झाला होता.
आराठी येथील विद्यानगर वसाहतीच्या मागे सरकारी जागेत ग्रामपंचायतीच्या डंपिंग ग्राऊंडसाठी चार गुंठे जागा मिळावी अशी मागणी आम्ही महसूल विभागाकडे केलेली आहे. – गजानन लेंडी, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, श्रीवर्धन