शहरात कचर्‍याचा ढिगारा

। अलिबाग । प्रमोद जाधव ।

शहर स्वच्छ ठेवण्यासाठी अलिबाग नगरपरिषदेमार्फत लाखो रुपये खर्च केले जात आहेत. तरीदेखील शहरात वर्दळीच्या ठिकाणी कचर्‍याचा ढिगारा आढळून येत आहे.

अलिबाग शहरातील एसटी बस स्थानक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, महावीर चौक ते जूनी नगरपालिका परिसरात अनेक ठिकाणी कचरा अस्ताव्यस्त पडलेला आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. अलिबाग पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचे शहर आहे. शहरामध्ये वर्षाला दोन लाखाहून अधिक पर्यटक येतात. शहरामध्ये जिल्हा, तालुका कार्यालयांसह वेगवेगळे लहान मोठे व्यवसाय आहेत. त्यामुळे नोकरी व्यवसायानिमित्त शहरात येणार्‍यांची संख्यादेखील दिवसेंदिवस वाढत आहे. शहरातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहवे, यासाठी अलिबाग नगरपरिषदेमार्फत शहरातील स्वच्छता राखण्याचा प्रयत्न केला जात आहे. शहरातील अनेक भागांमध्ये स्वच्छतेचा संदेश देणारे चित्र काढण्यात आले आहेत. नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. शहरातील कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार केली आहे. त्यासाठी एका कंपनीला ठेका दिला आहे.

या कंपनीमार्फत नियुक्त केलेल्या कामगारांद्वारे शहर स्वच्छ करणे, शहरातील कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावणे अशी अनेक कामे केली जात आहेत. त्यासाठी दर महिन्याला लाखो रुपये खर्च नगरपरिषद करीत आहे. मात्र दुसर्‍या देई ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण अशी अवस्था नगरपरिषदेच्या प्रशासनाची झाली आहे. शहराती एसटी बस स्थानक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, महावीर चौक ते जूनी नगरपालिका या परिसरात लहान मोठे उद्योग, व्यवसाय असून नागरिकांची वर्दळ मोठ्या संख्येने आहे. त्याच परिसरात ठिकठिकाणी कचर्‍याचा ढिगारा दिसून येत आहे. नागरिक येण्या जाण्याच्या मार्गावरच हा कचरा पडले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भिती निर्माण झाली आहे. नगरपरिषदेवर गेल्या दोन वर्षापासून प्रशासन राज आहे. प्रशासनाकडून शहरातील स्वच्छतेकडे लक्ष का दिले जात नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

शहरातील स्वच्छता राखण्यासाठी व्हीकेडी एजन्सीला ठेका दिला आहे. कचर्‍यांच्या समस्येंबाबत वारंवार त्यांना सुचना दिली जात आहे. मात्र त्यांच्याकडून समाधानकार काम होत नाही. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई देखील केली आहे. मात्र शहरातील कचरा स्वच्छ करण्याची कार्यवाही तात्काळ केली जाईल.

अंगाई साळुंखे
मुख्याधिकारी तथा प्रशासक
Exit mobile version