| उरण । वार्ताहर ।
उरण शहरातील मुलांना खेळण्यासाठी आरक्षित केलेल्या एकमेव स्वातंत्रवीर सावरकर मैदानावर सध्या कचर्याचे साम्राज्य पसरले आहे. त्यात जास्तीत जास्त प्लास्टिक कचरा दिसून येत आहे. अत्यंत घाण व दुर्गंधीयुक्त झालेल्या या खेळाच्या मैदानाकडे मुलांनी पाठ फिरवली आहे. तरी उरण नगर पालिकेच्या स्वच्छता दूतानी या मैदानाकडे लक्ष केंद्रित करावे अशी मागणी खेळाडू करत आहेत.
नगरपालिका हद्दीत एकमेव खेळाचे मैदान म्हणून आरक्षित आहे. या मैदानावर विविध शालेय मैदानी खेळाच्या स्पर्धा, फुटबॉल, कबड्डी स्पर्धाचे आयोजन केले जाते. त्याचबरोबर शहरातील मुले या मैदानात नेहमी खेळण्यासाठी येतात. मात्र सध्या या मैदानावर कचर्याचे साम्राज्य पसरले आहे. या कचर्यामुळे या मैदानावर कसे खेळतील अशी परिस्थिती दिसून येत आहे. संध्याकाळ होताच या मैदानात दारुडे व गर्दुले आपले बस्तान मांडतात. पर्यायाने दारूच्या रिकाम्या झालेल्या बाटल्या मैदानातच फोडून फेकून देतात त्यामुळे या मैदानात सर्वत्र काचांचे साम्राज्य पसरलेले दिसून येत आहे.