रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा स्तुत्य उपक्रम
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
विद्यार्थ्यांची निसर्गाशी जवळीकता वाढावी. त्यांना ताजे व विषमुक्त पोषणआहार मिळावे यासाठी रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभागमार्फत एक आगळा वेगळा उपक्रम हाती घेतला आहे. शाळांच्या परिसरात परसबागेची निर्मिती करून त्याठिकाणी वेगवेगळ्या भाजीपाल्यांची लागवड केली जाणार आहे. उत्पादित केलेल्या भाजीपाल्याचा शालेय पोषण आहारात समाविष्ट केली जाणार आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये दोन हजार 566 शाळा असून 95 हजार विद्यार्थी या शाळांमध्ये शिक्षण घेत आहे. जिल्हा परिषदेने नेमलेल्या ठेकेदाराकडून शाळांना पोषण आहार दिला जातो. त्यामध्ये तांदूळ, डाळ आदींचा समावेश आहे. शाळेत नेमलेल्या स्वयंपाकीच्या मदतीने ते अन्न शिजवून विद्यार्थ्याना पोषण आहार म्हणून दिला जातो. परंतु काही विद्यार्थी ते पोषण आहार खाण्यास टाळतात. त्यामुळे जिल्ह्यातील काही शाळांमधील कुपोषणाचे प्रमाण रोखण्यास प्रशासन उदासीन ठरले आहे. शाळकरी मुलांना भाजीपाल्याची माहिती मिळावी यासाठी रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभागाने एक वेगळा उपक्रम हाती घेतला आहे. जिल्ह्यातील शाळांमध्ये परबाग तयार केली जाणार आहे. त्या परसबागेत कमी कालावधीत उगविणार्या भाजीपाल्यांची लागवड केली जाणार आहे.
वर्षभर पुरतील अशा प्रकारच्या भाजीपाल्यांची लागवड केली जाणार आहे. अल्पकालीन भाजीपाला लागवड कमी जागेत करता येणार आहे. उत्पादीत केलेल्या भाजीपाला शाळेतील पोषण आहारासाठी वापरात आणल्यास त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. त्यामुळे हा उपक्रम लवकरच जिल्ह्यातील शाळांची राबविला जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.