सिडकोकडून पालिकेकडे हस्तांतरण
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
पालिकेत समाविष्ट कामोठे वसाहतीत सिडकोतर्फे बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीचे पालिकेकडे हस्तानंतरण झाले आहे. या स्मशानभूमीत सिडकोच्या माध्यमातून गॅसशवदाहीनी बांधण्यात आली आहे. गॅस जोडणी नसल्यामुळे बांधकाम होऊनही बंद असलेल्या या दाहिनीला गॅस जोडणी करण्यात आल्याने लवकरच ही शवदाहिनी वापरात येणार असल्याची माहिती पालिकेच्या अधिकार्यांनी दिली आहे.
पनवेल शहरातील अमरधाम स्मशान भूमी, खारघर येथील स्मशान भूमीत गॅसशवदाहीनीची सुविधा उपलब्ध आहे. पालिकेच्या माध्यमातून उपलब्ध आलेल्या या सुविधेचा वापर करण्यासाठी पालिके मार्फत केवळ 100 रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. हिंदू पद्धतीने अंत्यविधी करण्यासाठी लाकडाचा वापर केला जात असल्याने वृक्षतोड तसेच लाकडा मुळे होणार्या धुरामुळे पर्यावरणाची होणारी हाणी टाळण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी गॅसशवदाहिणीचा वापर करावा या हेतूने अत्यंत अल्प दरात पालिके मार्फत ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कामोठे वसाहती पाठोपाठ कळंबोली वसाहती मधील स्मशान भूमीत देखील सिडकोच्या माध्यमातून गॅसशववाहिनी बांधण्याचे काम करण्यात आले आहे. या ठिकाणी महानगर गॅस कंपनीच्या माध्यमातून गॅस जोडणी करण्यात आल्या नंतर गॅसशवदाहिणीचे पालिकेकडे हस्तानंतरण करण्यात येणार असल्याने पनवेल शहर, खारघर पाठोपाठ कामोठे आणि कळंबोली वसाहतीतदेखील गॅसवर अंत्यविधी करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.