| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन येथील मठाचा गवंड येथील स्मशानभूमीत नगर परिषदेने गॅस शवदाहिनी सुरु केल्यामुळे नागरिकांची मोठीच सोय झाली होती. परंतु, काही तांत्रिक कारणांमुळे ही शवदाहिनी सध्या बंदावस्थेत आहे. त्यामुळे नागरिकांची मोठीच गैरसोय होत आहे. गॅस शवदाहिनी बंद असल्यामुळे मृतदेहाचे लाकडांवर दहन करण्याशिवाय अन्य पर्याय उरत नाही. परंतु, सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने लाकडेही भिजलेली असल्यामुळे लवकर पेटत नाहीत. त्यामुळे मोठीच अडचण निर्माण होते. दुसरे म्हणजे शासकीय विश्रामगृहाजवळील स्मशानभूमीतील दहनाच्या जागेवरील पत्रेही उडाले असल्यामुळे पावसामुळे लाकडे पेटण्यास खूप विलंब लागतो. त्यातच भर म्हणून अग्नी प्रज्वलित करण्यासाठी आवश्यक असणारे रॉकेलही हल्ली उपलब्ध होत नसल्यामुळे खूप गैरसोय होते. शिवाय या स्मशानभूमीत सध्या कचऱ्याचे ढीग साचल्यामुळे नागरिकांची मोठीच गैरसोय होत आहे. या सर्वांची दखल घेऊन श्रीवर्धन नगर परिषदेने मठाचा गवंड येथील स्मशानभूमीत असलेल्या गॅस शवदाहिनीची लवकरात लवकर दुरुस्ती करुन नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.





