सुदर्शन कंपनीमध्ये वायुगळती; पाच कामगारांना बाधा

कंपनीच्याच सुरक्षा पथकाकडून गळती आटोक्यात

| महाड | प्रतिनिधी |

महाडमधील नामांकित सुदर्शन केमिकल्स या कारखान्यामध्ये सायंकाळच्या सुमारास क्लोरीन गॅसची अचानक गळती झाली. ही गळती निदर्शनास येतास काही वेळातच तेथील सुरक्षा पथकाने ती आटोक्यात आणण्यात यश मिळवले.

ज्या ठिकाणी गळती झाली, त्या ठिकाणी प्रत्यक्ष काम करणाऱ्या अफजल मोहम्मद (42), अशोक पवार (53), ओंकार हुंगेकर (25), नरेश चव्हाण (48), सुमन सिंग (32) या पाच कामगारांना वायूची किरकोळ बाधा झाली. त्यांच्यावर कारखान्याच्या ठिकाणी असलेल्या प्रथमोपचार सेंटरमध्ये उपचार करून सोडण्यात आले. सुदर्शन केमिकल्समध्ये कामगार सुरक्षेबाबत कायम खबरदारी घेतली जाते, यामुळे कामगार सुरक्षेच्या बाबतीमध्ये या कारखान्याचे कायम कौतुक होते. आज झालेल्या घटनेची त्यांनी प्रचिती आणून दिली. कारखान्यांच्या चार्जिंग पॉईंटमधून क्लोरीन टनेलचे गॅस किट लिकेज झाल्यामुळे वायुगळती झाल्याचे कारखाना व्यवस्थापक सुरेश काशीद यांनी सांगितले. येथील सर्व कामगारांना तात्काळ बाहेर काढून सुरक्षित केले. वायुगळती झाल्याची खबर आजूबाजूच्या ग्रामस्थांना कळताच ग्रामस्थांमध्येदेखील भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यांनी कंपनीच्या प्रवेशद्वारावर वाद घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत परिस्थिती आटोक्यात आणली होती.

ज्यावेळी कारखान्यामध्ये वायुगळती झाली, त्यावेळी कारखान्यामध्ये जवळपास 400 कामगार काम करत होते. महाड औद्योगिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मार्गाची टीमदेखील घटनास्थळी दाखल झाली होती. या घटनेनंतर काही काळ कारखाना बंद ठेवण्यात आला होता. पुढील तपास महाड एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक जीवन माने करीत आहेत.

Exit mobile version