। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
रत्नागिरी शहराजवळ टीआरपी येथे डीमार्ट समोर राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांमुळे सीएनजी टँकरमधून मोठ्या प्रमाणात वायू गळती सुरू झाली. यावेळी अचानक झालेल्या मोठ्या आवाजाने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. हा प्रकार घडल्यानंतर एमआयडीसी आणि नगर परिषद अग्निशमन पथकांनी तातडीने धाव घेतल्याने होणारा मोठा अनर्थ टळला. दरम्यान, गॅस लिकेजवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात यश आले. या घटनेमुळे सुमारे तासभरापेक्षा जास्त काळ मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी 8 वाजण्याच्या सुमारास कुवारबावकडून एका खासगी गॅस कंपनीचा टँकर रत्नागिरीच्या दिशेने येत होता. हा टँकर कुवारबाव परिसरातील डीमार्ट समोरील ठिकाणी मुख्य रस्त्यावर आला असता त्यातून गॅस गळती सुरू झाली. खड्ड्यात आपटल्यामुळे मोठ्या प्रमाणात गॅस बाहेर पडत होता.