। मुरूड । वार्ताहर ।
हर्ष हा साकारला मनी, आनंदाच्या या क्षणी, नवागतांचे करी स्वागत, सर्व पालक वृंद हे हसत खेळत, अशा आनंदाच्या क्षणांनी मुरुड तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा चोरढे मराठी येथे नवागतांचा मेळावा साकारण्यात आला.
मेळाव्याची सुरुवात ग्रामपंचायत कार्यालय चोरढे येथून करण्यात आली. नवीन दाखल पात्र सर्व 11 विद्यार्थी उपस्थित होते. तसेच एक विद्यार्थी जादा दाखल झाला. दाखल पात्र सर्व विद्यार्थ्यांची दोन घोडा गाडीतून मिरवणूक काढण्यात आली. लेझीम पथकात सर्व विद्यार्थी सामील झाले होते. काही विद्यार्थी लाठीकाठीचे प्रात्यक्षिक करत होते. खालुबाजा व इतर वाद्य वृंदाच्या सहाय्याने पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाद्यवृंदाच्या ठेक्यावर विद्यार्थ्यांसमवेत पालक सुद्धा नाचत होते. विद्यार्थ्यांनी फटाके वाजवून नवागतांचे स्वागत केले.
शाळेच्या प्रांगणात आल्यानंतर सविता वाडकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यानंतर पालक सभा घेण्यात आली. पालक सभेला सर्व पालक उपस्थित होते. शाळा प्रवेशाचा पहिला मेळावा घेण्यात आला. विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले. पहिला दिवस म्हणून मुलांना गोड खाऊ म्हणून खिरीचे वाटप करण्यात आले. पालकांतर्फे मंगळवारी परसबाग तयार करण्याचे ठरवण्यात आले.यावेळी चेतन पाटील, सरपंच तृप्ती घाग, सुरेश ताबडे, सुनील घाग, अनिल चोरढेकर आदी मान्यवर उपस्थित होते.