खारघरमध्ये वारकऱ्यांचा मेळावा

| पनवेल | वार्ताहर |

आध्यात्मिक विचार प्रचारक सामाजिक संस्थेच्यावतीने संत शिरोमणी श्री निवृत्ती महाराज जन्म सप्त शतकोत्तरी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित खारघरमध्ये 4 ते 12 फेब्रुवारीदरम्यान राष्ट्रीय वारकरी अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा कार्यक्रम होणार आहे. देशाचे तीन पीठाचे आचार्य, शंकराचार्य, संतांचे वंशज, वारकरी संस्थांचे पदाधिकारी, ज्येष्ठ कीर्तनकार, वारकऱ्यांसह राज्यातून जवळपास दहा लाख भाविक उपस्थित राहणार आहेत.

आध्यात्मिक विचार प्रचारक सामाजिक संस्था आणि रायगड, ठाणे आणि नवी मुंबई वारकरी संप्रदायाच्यावतीने खारघरमधील सेंट्रल पार्क मैदानात 4 ते 12 फेब्रुवारीदरम्यान अखंड हरिनाम सप्ताह होणार आहे. या सप्ताहाच्या माध्यमातून संतांचे विचार ज्ञानाची शिदोरी समाजाच्या मनामनात पोहचावी, जीवनात स्थिरता यावी, यासाठी सप्ताह सोहळ्यात संतांचे विचार जनतेपर्यंत जाणार आहेत. यावेळी रोज पहाटे चार ते सकाळी दहा या वेळेत काकड आरती, विष्णूसहस्त्रनाम पुष्पांजली, ज्ञानेश्वरी पारायण, हरिकीर्तन, सकाळी दहा ते सायंकाळी सहा यावेळेत गाथा भजन पावली, प्रवचन, सामुदायिक हरिपाठ, तर सायंकाळी साडेसहा ते अकरा यावेळेत हरिकीर्तन आणि संगीत चक्री भजन होणार आहे. 4 तारखेला हभप जयेश महाराज यांच्या हस्ते कीर्तनाचे उद्घाटन होणार असून कलश यात्रा देखील काढली जाणार आहे.

आध्यात्मिक विचारवंतांची उपस्थिती
नऊ दिवस चालणाऱ्या या सप्ताहात एक लाख भाविक उपस्थित राहणार आहेत. यावेळी पाच हजार ज्ञानेश्वरी वाचक, टाळकरी, तीन हजार मृदंग वादक आणि एक लाख श्रोतृवृंद असणार आहे. यावेळी स्वामिश्री सदानंद सरस्वती, श्री निश्चलानंद सरस्वती यांचे प्रवचन, तर श्रीगुरु महंत नामदेव महाराज शास्त्री यांचे कीर्तन होणार आहे. हरेश पाटील, उमेश महाराज, संदीपान शिंदे, महादेवबुवा शहाबाजकर, श्रीराम पारधी, चंद्रशेखर देगलूकर, सचिदानंद कांबेकर, चिदंबरेश्वर साखरे, प्रकाश बोधळे हे भजन, कीर्तन सादर करणार आहेत. तसेच राज्यातील विविध जिल्ह्यांतून उपस्थित राहणाऱ्या भाविकांच्या निवासाची सोय करण्यात आली आहे.
Exit mobile version