। मुंबई । प्रतिनिधी ।
भारतीय संघाच्या अलीकडच्या कामगिरीवर माजी फलंदाज मनोज तिवारीने प्रश्न उपस्थित करत गौतम गंभीरच्या प्रशिक्षक शैलीवर सडकून टीका केली आहे. गंभीर ऐवजी व्हीव्हीएस लक्ष्मण आणि साईराज बहुतुले हे भारतीय संघाचे प्रशिक्षक करण्यासाठी आदर्श पर्याय ठरले असते, असेही तो म्हणाला आहे.
गंभीरच्या प्रशिक्षकपदी विराजमान झाल्यानंतर भारतीय संघाने 27 वर्षात प्रथमच श्रीलंकेत वनडे मालिका गमावली. त्यानंतर घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत संघाला 0-3 असा पराभव स्वीकारावा लागला होता. तसेच 10 वर्षांनंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये संघाला पराभव पत्करावा लागला. मनोज तिवारी म्हणाला की, गौतम एक गंभीर ढोंगी आहे. तो जे बोलतो ते करत नाही. रोहित शर्मा कोठला आहे? मुंबईचा आहे. अभिषेक नायर कोठून आहे? मुंबईचा आहे. त्याला मुंबईचे खेळाडू पुढे ठेवण्याची संधी मिळाली आहे. जलज सक्सेनासाठी बोलणारे कोणी नाही. तो चांगली कामगिरी करतो, पण शांत राहतो. आता हा मॉर्ने मॉर्केल लखनौ सुपर जायंट्सकडून आला आहे. अभिषेक नायर केकेआरमध्ये गंभीरसोबत होता. हे लोक गौतम गंभीरसाठी सोयीस्कर आहेत. हे सर्व गंभीर सांगेल त्याप्रमाणे वागणारे लोक आहे. म्हणूनच त्यांचा कोचिंग स्टाफमध्ये समावेश करण्यात आला आहे, अशी जोरदार टीका तिवारी याने केली.