| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
जुलै महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यातून भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या माजी अनुभवी गौतम गंभीरने अलीकडेच सर्व फॉरमॅटमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंवर भर दिला आहे. गौतमचा बीसीसीआयसोबत 31 डिसेंबर 2027 पर्यंत करार आहे आणि त्याचे पहिले आव्हान याच महिन्यात सुरू होणार असून एका मुलाखतीत गंभीरने खेळाडू व्यवस्थापन आणि निवडीबाबत आपली प्रतिक्रया जाहीर केली आहे.
गंभीर म्हणाला की, माझा पूर्ण विश्वास आहे की, जर तुम्ही चांगले (तंदुरुस्त) असाल तर तुम्ही सर्व फॉरमॅटमध्ये खेळले पाहिजे. दुखापती हा कोणत्याही खेळाडूच्या आयुष्याचा भाग असतो. तुम्ही तिन्ही फॉरमॅट खेळत असाल आणि तुम्हाला दुखापत झाली असेल, तर परत जा, रिकव्हरी प्रक्रियेवर काम करा, पण तुम्ही तिन्ही फॉरमॅट खेळले पाहिजेत. तो म्हणाला की, तुम्ही एखाद्या विशिष्ट खेळाडूला ओळखता आणि मग त्याला वेगवेगळ्या फॉरमॅटसाठी राखून ठेवा, या कल्पनेचे मी अजिबात समर्थन करत नाही. आम्ही खेळाडूंचे तपशील, दुखापती, वर्कलोड मॅनेजमेंट आणि इतर सर्व काही व्यवस्थापित करणार आहोत.
या विधानाद्वारे, गौतमने हार्दिक पांड्यासह इतर खेळाडूंना स्पष्ट संदेश दिला आहे की, यापुढे जुने धोरण चालणार नाही. आता तुम्हाला हवे तेव्हा तुमच्या मनाप्रमाणे फॉरमॅट खेळता येईल, असे चालणार नाही. एकप्रकारे गौतमने पांड्याला स्पष्ट संदेश दिला आहे की, जर तंदुरुस्त असाल तर तुला तिन्ही फॉरमॅटमध्ये संघासाठी सर्वोत्तम योगदान द्यावे लागेल.