थ्रोबॉल स्पर्धेत गवाणकर शाळा अजिंक्य

| कर्जत | प्रतिनिधी |

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा संचालनातर्फे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा रायगड जिल्ह्यात सुरू आहेत. रविवारी खारघरच्या रामशेठ ठाकूर क्रीडा संकुलात रायगड जिल्हा थ्रोबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत प्रथमच भाग घेणाऱ्या माथेरानच्या प्रा. शांताराम गवाणकर शाळेच्या सतरा वयोगटातील विद्यार्थिनींनी अंतिम सामन्यात अलिबागच्या डेव्हिड हायस्कूलचा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला.

पॅट्रीशिया रॉड्रीगज, रुपाली शिंगाडे, जागृती झोरे, अलिजा चिपाडे यांनी आक्रमक खेळ केला. प्राजक्ता कदम हिने प्रभावी नेतृत्व केले. प्रा. गवाणकर शाळेचे ट्रस्टी शशीभूषण गवाणकर व मुख्याध्यापिका कल्पना पाटील यांनी खेळाडूंचे कौतुक केले. संघपाल वाठोरे यांनी संघाचे व्यवस्थापक, तर सुनील शिंदे यांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले.

कोकण विभागातील सात जिल्हे मुंबई, मुंबई उपनगर, रायगड, ठाणे पालघर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या विजयी संघाची विभागीय स्पर्धा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येईल, असे क्रीडा अधिकारी मनीषा मानकर यांनी सांगितले. थ्रोबॉल संघटनेचे पदाधिकारी विलास मोरे, मंदार मुंबईकर, स्वप्नील मोरे, मयुरेश सर, सूरज पाटील यांनी पंचांचे काम केले व स्पर्धा यशस्वीपणे पार पाडली.

Exit mobile version