गावठी हातभट्टीची दारु तयार करणारा अटकेत

| पुणे | प्रतिनिधी |

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून बनावट गावठी हातभट्टी बनवणारा कारखाना उध्वस्त केल्याची माहिती समोर आली आहे. लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या अष्टापूर ग्रामपंचायत हद्दीतील फळीवस्ती येथील ओढ्यालगत सुरु असलेल्या गावठी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनी ही कारवाई केली आहे. रामभोला मकाशी नानावत (20, रा. फळीवस्ती, अष्टापूर, पुणे) असे गुन्हे शाखेनी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

गुन्हे शाखेच्या युनिट 6 चे पथक लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या अष्टापूर ग्रामपंचायत हद्दीत गस्त घालत असताना त्यांना याबाबतची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार फळीवस्ती येथील ओढ्यालगत पोलिसांनी छापा टाकला असता रामभोला नानावत याच्या ताब्यात 2 हजार लीटर कच्चे रसायन (गुळ, नवसागर, तुरटी मिश्रित), 1 मोठा लोखंडी बॅरल, 35 लीटर तयार दारू असा एकूण 50 हजार रूपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला आहे. आरोपीवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. लगेच कारवाई करत रामभोला नानावत याला ताब्यात घेतले. त्याचबरोबर भट्टी लावून दारू काढत असलेले सामान देखील यावेळी नष्ट करण्यात आले आहे.

Exit mobile version