एसटीच्या संपाने गावगाडा थांबला

गैरसोय आणि त्रास, व्यवहार ठप्प
एसटी सुरू करण्याची मागणी
। रायगड । वार्ताहर ।
ग्रामीण व शहरी भागात दळणवळणाचे मुख्य साधन म्हणून एसटी महत्वपूर्ण मानली जाते, मात्र एसटी बंदसल्याने एकूणच जनजीवणावर मोठा परिणाम झाला आहे. एसटीच्या संपामुळे जिल्ह्यातील गाव-खेड्यातील व्यवहार व जीवनक्रम अक्षरशः थांबला आहे. जिल्ह्यातील गावे व वाड्या विविध कारणांनी शहरी व निमशहरी भागांशी जोडल्या आहेत. सुधागड तालुका आदिवासी बहुल तालुका आहे, अशातच गाव व आदिवासी वाड्यापाड्यांतून शहराकडे व इतर मोठ्या गावात दूध, भाजी घेऊन येणारे विक्रेते व मजूर यांना एसटीचाच आधार आहे. मात्र एसटी संपामुळे त्यांची खूप मोठी गैरसोय होतांना दिसत आहे. शिवाय विविध प्रशासकीय व बँक कामांसाठी तालुक्याच्या ठिकाणी जाणार्‍या लोकांची कामे खोळंबली आहेत. शहर व मोठ्या गावातील बाजारपेठांमध्ये देखील शुकशुकाट पहायला मिळत आहे. एकूणच संपूर्ण ग्रामीण व शहरी भागाचे अर्थचक्र व व्यवहार थांबले आहेत.
जिल्ह्यात सध्या गावठी भाज्यांचा व कंदमुळांचा हंगाम जोरात सुरू आहे. येथील आदिवासी वाड्यापाड्यावरील आदिवासींना या गावठी भाज्या व कंदमुळे विकून उदरनिर्वाह चालतो. हे सर्व जिन्नस घेऊन त्यांना शहरातील व मोठ्या गावातील बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी यावे लागते. मात्र आजघडीला एसटी बस बंद असल्याने अनेकांना अधिकचे पैसे देऊन खाजगी वाहनांनी यावे लागत आहे. तर काहीजणांना हे अतिरिक्त भाडे परवडत नसल्याने डोक्यावर हा भार घेऊन डोंगरवाटा तुडवत यावे लागत आहे. दूध विक्रेत्यांची देखील अशीच अवस्था आहे. रोजचे उकडे टाकण्यास त्यांना यावेच लागते. मग उत्पादन खर्च आणि प्रवास खर्च याचा मेळ लागत नाही. अशावेळी त्यांना देखील नाईलाजाने पायीच वाट चालावी लागत आहे. असे ताई बावधणे या दूध विक्रेत्या महिलेने सांगितले.
परिणामी लोकांना हातावर हात धरून बसावे लागत आहे. वैद्यकीय उपचारासाठी दवाखान्यात जाणे देखील दुरापास्त झाले आहे. याबरोबरच विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी व घरी जाण्यासाठी कित्येक किमीची खडतर पायपीट करावी लागत आहे. कामावर जाणार्‍या चाकरमान्यांना अधिकची रक्कम देऊन जावे लागत आहे. एसटीच्या संपाची झळ सर्वांनाच पोहचत आहे. परिणामी जिल्ह्यातील गावगाडा थांबला असून अनेक व्यवहार ठप्प झाले आहेत.

Exit mobile version