। महाड । प्रतिनिधी ।
एका अल्पवयीन मुलीशी विवाह करून तिच्याजवळ अनैतिक संबंध ठेवणार्या तरुणावर महाड औद्योगिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी तरुणाला अटक केली आहे. महाड तालुक्यातील ढालकाठी या गावी ही घटना घडली .पीडित मुलीच्या आईने महाड औद्योगिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव राजेंद्र राहुल जाधव असे असून तो ढालकाठी गावचा रहिवासी आहे तर पीडित अल्पवयीन मुलगी ही शेजारील खरवली बौद्धवाडी येथील रहिवासी आहे. पीडित मुलगी ही अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही तिला फूस लावून राजेंद्र यांने तिच्याजवळ प्रेमसंबंध प्रस्थापित करून तिच्याशी लग्न केले, आणि यानंतर त्याने या पीडित मुली सोबत महाड , खरवली व ठाणे या ठिकाणी अनैतिक संबंध देखील ठेवले. हा प्रकार 15 फेब्रुवारी ते 24 एप्रिल 2022 या कालावधीत घडला. याबाबत सदर अल्पवयीन मुलीच्या आईने महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात या तरुणा विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार या तरुणावर बलात्कार, लैंगिक शोषण व पोक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून राजेंद्र याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नागदिवे करत आहेत.