गीतेंना मतांची आघाडी मिळणार: आ. जयंत पाटील

| माणगाव | प्रतिनिधी |

जिल्ह्यात हवा तटकरेंच्या विरोधात असून, इंडिया आघाडीने चांगली बांधणी केली आहे. रायगड लोकसभा निवडणुकीत श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून अनंत गीते प्रचंड मतांची आघाडी घेतील, असा विश्‍वास शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी माणगाव येथील बैठकीत बोलताना व्यक्त केला. रायगड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक येत्या 7 मे रोजी होत असून, त्यासंदर्भात माणगाव तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बुधवार दि.1 मे रोजी माणगावात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी आ. जयंत पाटील यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

या बैठकीला पक्षाचे ज्येष्ठ नेते अस्लम राऊत, गोविंद पवार, माजी समाज कल्याण सभापती अशोक गायकवाड, हसनमिया बंदरकर, नामदेव शिंदे, चंद्रकांत सत्वे, दिलीप उतेकर, इनायत टाके, युवा नेते स्वप्नील दसवते, मोर्बा माजी सरपंच विलास गोठल, माजी उपसरपंच अमोल मोहिते, देगाव सरपंच सुषमा वाघमारे, उपसरपंच दिनेश गुगले, नितीन वाघमारे, नरेश दळवी, अय्याज मुल्ला, अजीम बंदरकर, सुभाष अर्बन, रामदास जाधव आदींसह शेकाप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आ. जयंत पाटील पुढे म्हणाले की, देशात मोदी विरोधात लाट असून, इंडिया आघाडीला सर्वत्र उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. मुस्लिम व दलित समाज मोदींच्या विरोधात असून, हे समाज इंडिया आघाडीबरोबर आहेत. त्यामुळे रायगड लोकसभेतील आपल्या इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांना प्रचंड मताधिक्य मिळणार असून, श्रीवर्धन मतदारसंघातून प्रचंड मतांची आघाडी गीतेंना मिळणार आहे. या निवडणुकीनंतर तटकरे पुन्हा उभा राहू शकणार नाहीत. ही निवडणूक आपली समजून इंडिया आघाडीचे सर्व कार्यकर्ते कामाला लागले आहेत. शेकापने माणगावात अनेकांना मोठे केले; पण जे कोणी पक्ष सोडून गेले, त्यांचा काहीही परिणाम पक्षावर झाला नाही. आजही शेकापच्या सभांना जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. लवकरच माणगाव तालुका चिटणीसची आपण नियुक्ती करू असे सांगत अनंत गीते यांना निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागा, असे आवाहन आ. पाटील यांनी केले.

Exit mobile version