। माणगाव । प्रतिनिधी ।
32 रायगड लोकसभा मतदार संघातील इंडिया आघाडीच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ माणगावात उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले असून अनंत गीते यांचा घर टू घर प्रचार करीत आहेत. माणगाव नगरपंचायत हद्दीतून अनंत गीतेंना जास्तीत जास्त मताधिक्य देणार असा विश्वास नगरपंचायतीचे नगरसेवक अजित तारलेकर यांनी प्रचार फेरी दरम्यान प्रसार माध्यमांजवळ बोलताना व्यक्त केला.
रायगड लोकसभा मतदार संघाची निवडणूक येत्या 7 मे रोजी होत असून या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. या मतदार संघात एकूण 13 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून खरी लढत इंडिया आघाडीचे अनंत गीते व महायुतीचे तटकरे या दोन उमेदवारांमध्ये आहे. अनंत गीते हे सहा वेळा खासदार म्हणून निवडून आले असून दोन वेळा केंद्रात त्यांनी मंत्री म्हणून काम केले आहे. एक अनुभवी लोकप्रतिनिधी व सदाचारी व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे जनता आदराने पाहत आहे. त्यांच्यासारख्या लोकप्रतिनिधींची आज रायगडवासीयांना गरज असल्याने त्यांच्या विजयासाठी इंडिया आघाडीचे कार्यकर्ते दिवस-रात्र एक करून कोणतीही अपेक्षा न ठेवता त्यांची मशाल निशाणी घराघरात पोहचवुन अथक परिश्रम घेऊन त्यांना सातव्यांदा रायगडचा शिलेदार म्हणून निवडून पाठविण्यास उत्सुक आहेत.
भाजपच्या भूमिकेवर नाराज असलेले अनेक मुस्लिम बांधवही उद्धव ठाकरे यांनी कोविड काळात केलेली कामगिरी पाहता व राज्यातील राजकीय समीकरणे बदलल्यावर त्यांचे मुख्यमंत्री पद गेल्याने त्यांना सहानुभूती म्हणून त्यांना ताकद देण्यासाठी गीते यांना निवडून आणण्यासाठी एक दिलाने काम करत आहेत. माणगाव नगरपंचायत हद्दीतील सर्व 17 वार्डांतून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते नगरसेवक अजित तारलेकर, अजिंकेश जाधव, इब्राहिम करेल, परेश उभारे, प्रवीण पाटोळे, दादाराम चव्हाण, राजू चव्हाण, गंगाराम काते, ऋषी मोरे, यज्ञेश शिंदे, विशाल घरवे, सागर गांधी, अनिल सोनार, लालू, हार्दिक काते, अभिजित घोणे, अजिंक्य मिरजकर, अंकित कदम व त्यांचे इतर सर्व कार्यकर्ते प्रचार फेरी काढून अनंत गीते यांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळून देण्यासाठी उत्सुक आहेत.
या प्रचार फेरीदरम्यान प्रसार माध्यमांजवळ बोलताना नगरसेवक अजित तारलेकर म्हणाले कि, आमच्या इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीतेंना सर्व वार्डांतून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मतदार बंधू-भगिनींचा लाभत आहे. जीवनाआवश्यक वस्तूंचे प्रचंड वाढलेले भाव, इंधनाचे वाढलेले भाव, वाढती बेरोजगारी, लहान-मोठ्या व्यावसायिकांवर लादण्यात आलेली जीएसटी, शेतकर्यांच्या वाढत्या आत्महत्या, मुस्लिम बांधवांच्या विध्यार्थ्यांना मौलाना अबुल कलाम आझाद आर्थिक विकास महामंडळाकडून मिळत नसलेली शिष्यवृत्ती या सार्या प्रश्नाच्या बाबतीत महायुतीच्या सरकारबद्दल जनतेत प्रचंड नाराजी आहे. याचा फायदा इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांना होऊन ते प्रचंड मतांनी निवडून येतील, असा विश्वास तारलेकर यांनी व्यक्त केला.