स्वच्छ पनवेलसाठी महासभा

। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल महानगरपालिकेस केंद्र शासनामार्फत फाईव्ह स्टार मानांकन मिळणेकामी प्रस्ताव देणेकरिता सर्वसाधारण सभेची मंजुरी आवश्यक असते. हा विषय आज झालेल्या महासभेमध्ये एकमताने मंजूर करण्यात आला. महापौर डॉ. कविता किशोर चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे ऑनलाईन पध्दतीने महासभा घेण्यात आली. यावेळी आयुक्त गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त विठ्ठल डाके, नगरसचिव तिलकराज खापर्डे, पालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


पनवेल शहर स्वच्छ होण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकत स्वच्छ भारत अभियान अंतर्गत पनवेल महानगरपालिका क्षेत्र हागणदारी मुक्तीचा टप्पा ODF++ घोषित करण्याच्या विषयास तसेच महाराष्ट्र शासनाच्या पनवेल महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापनाकरिता सुधारित मंजूर प्रकल्प अहवालातील वाढीव घंटागाड्या खरेदी करण्याच्या विषयास महासभेमध्ये मंजुरी देण्यात आली. पनवेल महानगरपालिका हद्दीतील विविध 03 ठिकाणी शाळा बांधकाम करणे, एका ठिकाणी समाज मंदिर बांधणे, सभागृहाचे वाढीव काम करणे तसेच पनवेल, कळंबोली व खारघर येथील एकूण 14 गार्डन (उद्याने) यांचे दोन वर्षा करिता संगोपन करण्याच्या विषयास सर्व साधारण सभेने मंजूरी दिली. पनवेल महानगरपालिकेचे स्वत:चे माता व बाल संगोपन केंद्र/हॉस्पिटल उभारणेबाबत व व्यवहार्यता पडताळणी अहवाल सर्वसाधारण सभेपुढे सादर करण्यात आला. तसेच याचे प्रेझेंटन यावेळी सर्वसाधारण सभेपुढे देण्यात आले. हा विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

Exit mobile version